११ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट साध्य करू - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
११ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट साध्य करू - बाळासाहेब थोरात

◻️ सहकारमहर्षी थोरात साखर कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा संपन्न


संगमनेर LIVE (अनिल शेळके) | पारदर्शक कारभार आणि उच्च गुणवत्तेमुळेच थोरात कारखान्यावर सभासद, शेतकरी आणि पठाभागातील ऊस उत्पादकांचा अतूट विश्‍वास आहे. प्रतिकूल हवामान आणि दुष्काळी परिस्थितीमुळे यंदाचा गाळप कालावधी कमी असला, तरी नियोजित वेळेत ११ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब थोरात यांनी केले.

​सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात ते बोलत होते. यावेळी संचालक मंडळ, अधिकारी, शेतकरी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​यंदाच्या हंगामाची दिशा स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, १५ ऑक्टोबरपासून हंगाम सुरू करण्याचे शासनाचे निर्देश असून, कमी उपलब्ध दिवसांत ११ लाख मेट्रिक टन गाळपाचे आव्हान आपल्याला पेलायचे आहे. यासाठी कारखान्याची दैनिक गाळप क्षमता ९ हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्याचे विस्तारीकरण हाती घेण्यात आले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्यक्षेत्रात किमान ९ लाख मेट्रिक टन ऊसाची उपलब्धता होणे आवश्यक असून, शेतकऱ्यांनी एकरी टनेज वाढीवर विशेष भर देण्याची गरज आहे. त्याचबरोबर शेतीसाठी अत्यंत आवश्यक असणारे हक्काचे पाणी, ११ तास अखंडित वीजपुरवठा आणि रखडलेला पीक विमा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा केला जाईल.

​कारखान्याच्या भविष्यातील वाटचालीविषयी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे विचार आणि शेतकऱ्यांचे पाठबळ यामुळे कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे. अगदी २०० किमी अंतरावरून ऊस आणूनही आपण शेतकऱ्यांना समाधानकारक भाव दिला आहे. आता कारखान्याची दैनिक गाळप क्षमता ९ हजार मेट्रिक टनांपर्यंत नेण्यासाठी विस्तारीकरणाचे काम वेगाने हाती घेतले जात आहे. पूर्ण क्षमतेने गाळप झाल्यास साखर उत्पादनासह मोलासिस, अल्कोहोल व सहवीजनिर्मिती प्रकल्पातून कारखान्याला मोठी आर्थिक ताकद मिळते. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात ऊस लागवड व उत्पादनवाढीवर भर द्यावा.”

​तालुक्यातील शेती प्रश्नांकडे लक्ष वेधताना थोरात म्हणाले की, “यावर्षी कमी पावसामुळे शेतकरी गंभीर तणावाखाली आहेत. अशा संकटाच्या काळात तालुक्यात विजेचा खेळखंडोबा सुरू असून शेतीसाठी हक्काची ११ तास वीज मिळत नाही. डॉ. जयश्री थोरात यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरच वीजपुरवठा सुरळीत होतो, याचाच अर्थ हा पुरवठा जाणीवपूर्वक खंडित केला जात होता. हक्काचे पाणी आणि नियमित विजेसाठी आपल्याला पुन्हा एकदा तीव्र संघर्ष करावा लागेल.” असे त्यांनी नमूद केले.

​दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ न मिळणे ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे नमूद करत थोरात म्हणाले, “आमच्या कार्यकाळात तालुक्यातील शेतकऱ्यांना नेहमीच मोठ्या प्रमाणावर पीक विमा मिळाला. या हंगामातही शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा मिळवून देण्यासाठी आम्ही जातीने लक्ष घालू.” अशी ग्वाही दिली.

दरम्यान, विरोधकांवर निशाणा साधताना ते पुढे म्हणाले, “आम्ही जनसेवेतून कामे उभी केली, कधी प्रसिध्दीसाठी फ्लेक्सबाजी केली नाही. मात्र सध्या कोणतीही ठोस कामे न करता केवळ फ्लेक्सबाजीचे राजकारण सुरू आहे,” असा टोला त्यांनी नाव न घेता लगावला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !