​शिर्डी पोलिसांकडून कुख्यात दुचाकीचोर जेरबंद!

संगमनेर Live
0
​शिर्डी पोलिसांकडून कुख्यात दुचाकीचोर जेरबंद!

◻️ जिल्हा व जिल्ह्याबाहेरील ११ मोटारसायकल चोऱ्यांचा पर्दाफाश!

संगमनेर LIVE (​शिर्डी) | मंदिरांची नगरी असलेल्या शिर्डी आणि लगतच्या परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात शिर्डी पोलिसांना मोठे यश आले आहे. संशयित आरोपी विशाल चव्हाण (वय २४) याला अटक करून पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या तब्बल ११ मोटारसायकल चोऱ्यांचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईमुळे अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यातील दुचाकी चोरांचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ​शिर्डी पोलीस ठाण्यात ११ सप्टेंबर २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) नुसार दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता (गु.र.नं. ८०६/२०२६). या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय केले होते. तपासादरम्यान संशयित विशाल चव्हाण (मूळ रा. जि. छत्रपती संभाजीनगर, सध्या रा. शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) याच्यावर संशय बळावल्याने पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

​संशयिताची कसून आणि सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. केवळ शिर्डीच नव्हे, तर पैठण, बिडकीन, छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव, नगरदेवळा आणि सोयगाव या भागांतून दुचाकी चोरून लपवून ठेवल्याची माहिती त्याने दिली. पोलिसांनी आरोपीला सोबत घेऊन विविध ठिकाणी छापे टाकत चोरीच्या सर्व मोटारसायकली जप्त केल्या.

​आरोपी चव्हाण याच्याकडून आतापर्यंत ११ दुचाकी चोरीचे गुन्हे निष्पन्न झाले असून यामध्ये शिर्डी, श्रीरामपूर, चाळीसगाव शहर, चाळीसगाव ग्रामीण तसेच नेवासा या पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांचा समावेश आहे. आरोपीकडून जप्त केलेल्या वाहनांच्या आधारे इतरही पोलीस ठाण्यांत दाखल असलेले आणखी काही गुन्हे लवकरच उघडकीस येण्याची दाट शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, सहायक पोलीस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, प्रदीप बोराडे व महादेव गुट्टे यांच्या पथकाने केली. 

दरम्यान, या कारवाईत पोलीस अंमलदार संतोष लांडे, राघव कोतकर, केवलसिंग राजपूत, नामदेव नालेगावकर, अजय अंधारे, सुनील दिघे, मंगेश भोसले, आकिब इनामदार आणि होमगार्ड रोहित सूर्यवंशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष लांडे व पोलीस अंमलदार राघव कोतकर करत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !