“बळीराजा सुखी होऊ दे!” आमदार अमोल खताळ यांची गणरायाकडे प्रार्थना!
◻️ कुटुंबासमवेत घेतले पुण्यातील प्रमुख मानांच्या गणपतींचे दर्शन
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | गणेशोत्सवानिमित्त संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी पत्नी सौ. नीलम खताळ आणि कुटुंबीयांसह पुणे शहरातील प्रसिध्द व मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची विधिवत अभिषेक पूजा आणि महाआरती करत “राज्यात समाधानकारक पाऊस पडू दे आणि बळीराजा सुखी-समृध्द होऊ दे,” अशी प्रार्थना लाडक्या बाप्पाच्या चरणी केली.
गणेशोत्सवानिमित्त आमदार अमोल खताळ यांनी पुण्यातील ऐतिहासिक व श्रध्दास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, मानाचा पहिला श्री कसबा गणपती तसेच लोकमान्य टिळकांच्या परंपरेचा वारसा लाभलेल्या केसरीवाडा गणपती चरणी लीन होऊन दर्शन घेतले.
दर्शनानंतर आपल्या भावना व्यक्त करताना आमदार खताळ म्हणाले, “समाजातील प्रत्येक घटकाला उत्तम आरोग्य, सुख आणि भरभराट लाभो. सर्व कुटुंबांमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण व्हावे. तसेच शेतकरी बांधवांना समृध्दी मिळावी आणि बळीराजावरील सर्व संकटे दूर व्हावीत, यासाठी विघ्नहर्त्या गणरायाकडे साकडे घातले आहे.”
या दौऱ्यादरम्यान विविध देवस्थान व उत्सव समित्यांच्या वतीने आमदार अमोल खताळ व त्यांच्या पत्नी सौ. नीलम खताळ यांचा शाल, श्रीफळ व गणरायाची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
दरम्यान, याप्रसंगी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने व कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती उत्सव ट्रस्टचे उत्सवप्रमुख व अध्यक्ष पुनीत बालन तसेच केसरीवाडा गणपती ट्रस्टचे शैलेश टिळक या प्रमुख मान्यवरांनी खताळ दांपत्याचे स्वागत करून त्यांचा यथोचित सत्कार केला.