‘हाफ मर्डर’चा गुन्हा न दाखल करण्यासाठी ५ लाखांची लाच मागणारा पोलीस जाळ्यात
◻️ १ लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना एसीबीची धडक कारवाई
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | हॉटेल कामगारावर ‘हाफ मर्डर’ आणि ‘रॉबरी’सारखा गंभीर गुन्हा दाखल न करता सौम्य गुन्हा दाखल करण्यासाठी तसेच जामिनासाठी मदत करण्याचे आमिष दाखवून तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पाथर्डी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. विनोद मासाळकर (वय ३७) असे लाचखोर पोलीस अंमलदाराचे नाव असून, तडजोडीअंती ठरलेल्या रकमेपैकी १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या हॉटेलमध्ये काम करणारा कामगार मोटारसायकलवरून पाथर्डी गावातून जात असताना एका अनोळखी ट्रक चालकासोबत गाडीला कट मारल्यावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. या प्रकरणात पोलीस अंमलदार मासाळकर याने तक्रारदारास गाठून, “तुमच्या कामगारावर हाफ मर्डर आणि रॉबरीचा गंभीर गुन्हा दाखल करतो,” अशी थेट धमकी दिली.
त्यानंतर तक्रारदाराने पाथर्डी पोलीस ठाण्यात जाऊन मासाळकर याची भेट घेतली असता, त्याने वरिष्ठांशी बोलून गंभीर गुन्हा न नोंदवता मारामारीचा सौम्य गुन्हा दाखल करण्याचे आणि न्यायालयातून तातडीने जामीन मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या मोबदल्यात त्याने तक्रारदाराकडे चक्क ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी १८ सप्टेंबर रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन रीतसर तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे १९ सप्टेंबर रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान पोलीस अंमलदार मासाळकर याने ५ लाख रुपयांवरून तडजोड करत २ लाख १५ हजार रुपये लाच घेण्याचे मान्य केले.
त्यानंतर पथकाने लागलीच सापळा रचला. तक्रारदाराकडे त्यावेळी उपलब्ध असलेला पहिला हप्ता म्हणजेच १ लाख रुपये पंचांसमक्ष स्वीकारताना मासाळकर याला पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान आरोपीच्या अंगझडतीतून एक ‘विवो’ कंपनीचा स्मार्टफोन, १५ हजार १३० रुपयांची रोकड आणि एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीच्या घराची झडती घेण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.
ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर, पोलीस हवालदार दिनेश खैरनार, अविनाश पवार आणि पोलीस शिपाई योगेश शिंदे यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास अहिल्यानगर एसीबीच्या पोलीस निरीक्षक सविता तांबे करत आहेत.
दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने शासकीय कामासाठी किंवा कायदेशीर कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन ‘एसीबी’तर्फे करण्यात आले आहे.