उंबरी बाळापुर येथे गणेशोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
◻️ इंदुरीकर महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | गणेशोत्सवानिमित्त उंबरी बाळापूर (ता. संगमनेर) येथील प्रवरा डाव्या कालव्यालगत भव्य ‘अखंड हरिनाम सप्ताह’ आणि ‘ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. धर्मवीर संभाजीराजे मित्र मंडळाच्या वतीने १६ ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत हा सप्ताह सोहळा पार पडत असून, बुधवार दि. २३ सप्टेंबर रोजी ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे. या सोहळ्याचे हे सलग १५ वे वर्ष आहे.
सप्ताह काळात दररोज पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ व आरती असे नित्य धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. तसेच सायंकाळी नामवंत कीर्तनकारांच्या सुश्राव्य कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सचिन महाराज गायकवाड, बाळासाहेब महाराज उंबरकर, विवेक महाराज मगर, महंत दत्तगिरी महाराज, दीपक महाराज देशमुख, नितीन महाराज गोडसे आणि कारभारी महाराज झरेकर आदींच्या कीर्तनाचा भाविक लाभ घेता येत आहेत. तर, कीर्तनानंतर दररोज भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जात आहे.
सप्ताहाची सांगता बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या अमृततुल्य काल्याच्या कीर्तनाने होईल. कीर्तनानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, सप्ताहाच्या सांगतेनंतर गुरुवारी (दि. २४ सप्टेंबर) श्री सत्यनारायण महापूजा संपन्न होईल. तसेच शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर रोजी पारंपरिक वाद्य, ढोल-ताशांच्या गजरात श्री गणरायाची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या संपूर्ण धार्मिक सोहळ्याचा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन धर्मवीर संभाजीराजे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.