स्वीडनच्या संसदेत निला विखे पाटील यांची खासदार म्हणून ऐतिहासिक निवड!
◻️नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून पुतणीचे कौतुक आणि शुभेच्छा!
संगमनेरLIVE (अनिल शेळके) | महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील नेतृत्वगुणांची ओळख आता थेट जागतिक पटलावर उमटली आहे. स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निला विखे पाटील यांची निवड झाली असून, त्यांच्या या ऐतिहासिक यशाने विखे पाटील परिवारासह संपूर्ण लोणी गावाचा आणि महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे. जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निवडीचे मनापासून स्वागत करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
या यशावर आनंद व्यक्त करताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “आमच्या कुटुंबातील एका सदस्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर एवढ्या मोठ्या पदावर निवडून येणे ही अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवाची बाब आहे. निला विखे पाटील यांनी तिथल्या सामाजिक व राजकीय पटलावर सातत्याने दिलेले योगदान आणि प्रामाणिक निष्ठेचेच हे फलित आहे. त्यांच्या या यशाचा आनंद केवळ आमच्या कुटुंबापुरता मर्यादित नसून, संपूर्ण लोणी ग्रामस्थांना आणि महाराष्ट्राला याचा सार्थ अभिमान वाटत आहे.” असे गौरवोद्गार काढले.
मंत्री विखे पाटील यांनी पुढे नमूद केले की, निला यांच्या कार्यपध्दतीवर कुटुंबातील ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय खासदार साहेबांच्या विचारांचा आणि लोकसेवेच्या मूल्यांचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो. तिथल्या स्थानिक नागरिकांच्या सुख-दुःखात प्रत्यक्ष सहभागी होत त्यांनी प्रस्थापित केलेला दांडगा जनसंपर्क हाच त्यांच्या या यशाचा मुख्य पाया ठरला आहे.
निला विखे पाटील यांचा स्वीडनमधील राजकीय आणि प्रशासकीय प्रवास अत्यंत उल्लेखनीय राहिला आहे. त्यांनी यापूर्वी स्वीडनच्या पंतप्रधानांच्या सल्लागार म्हणून महत्त्वाची धोरणात्मक जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली असून, स्टॉकहोम नगरपरिषदेत लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपल्या प्रभावी कार्यशैलीची छाप उमटवली आहे. त्याचप्रमाणे, स्वीडनमध्ये बालकल्याण, बालहक्क आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य विशेष दिशादर्शक मानले जाते. या बहुआयामी कार्याची पावती म्हणून त्यांना संसदेवर निवडून जाण्याची ही ऐतिहासिक संधी मिळाली आहे.
स्वीडनमधील जनतेच्या अपेक्षा व आकांक्षा यशस्वीपणे पूर्ण करत त्या आपल्या कार्यशैलीने यशाची आणखी नवी शिखरे सर करतील, असा दृढ विश्वास व्यक्त करत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीस मनःपूर्वक सदिच्छा दिल्या.