बैल हा मातीला सोनं बनवणारा बळीराजाचा खरा साथीदार - बाळासाहेब थोरात
◻️ जोर्वे येथे बैलपोळा उत्साहात; माजी मंत्री थोरात यांची सरकारकडे हमीभावाची मागणी
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र शेतात राबणारा आणि मातीला सोनं बनवणारा बैल हाच बळीराजाच्या कष्टाचा खरा साथीदार आहे. आजच्या यांत्रिक युगातही पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण असून शेतकरी संकटात असताना सरकारने त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहून शेतीमालाला योग्य हमीभाव दिला पाहिजे, असे मत राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
जोर्वे येथील ‘संतसावली’ या निवासस्थानी थोरात परिवाराच्या वतीने पारंपरिक पदध्तीने बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सौ. कांचनताई थोरात, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह थोरात परिवारातील सदस्य आणि जोर्वे परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, “पुरातन काळापासून शेती कामात बैलांचे योगदान मोलाचे राहिले आहे. शेतकऱ्याचा खरा जीव त्याच्या पशुधनात असतो. ग्रामीण संस्कृतीत दारासमोर गाय-बैल असणे ही मोठी प्रतिष्ठा मानली जाते. आज कृषी क्रांती आणि ट्रॅक्टरच्या वापरामुळे शेतीत आधुनिकता आली असली, तरी बळीराजाचे पशुधनावरील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. घरातील महिला भगिनी पुरणपोळीचा नैवेद्य करून मोठ्या आनंदाने बैलांची पूजा करतात, ही आपली महान कृषी संस्कृती आहे.”
सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करताना थोरात म्हणाले की, “सध्या पावसाने मोठी ओढ दिल्याने सोयाबीन, मका यांसह सर्वच खरीप पिके धोक्यात आली आहेत. शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला असून त्याच्या शेतीमालाला रास्त भाव मिळत नाही. अशा बिकट काळात राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून तातडीने दिलासा दिला पाहिजे.”
तसेच, राज्यात सर्वदूर चांगला पाऊस पडून दुष्काळाचे व ‘अलनिनो’चे सावट टळावे आणि बळीराजा सुखी व्हावा, अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली. आपण कृषी मंत्री म्हणून काम करताना शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कायम मदतीची भूमिका घेतली, याची आठवणही त्यांनी करून दिली.
याप्रसंगी डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, “शेतकऱ्यांच्या जीवनात शेती आणि पशुधनामुळेच समृध्दी येते. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पवित्र दिवस आहे. म्हणूनच लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत दरवर्षी सर्व गावकऱ्यांना सोबत घेऊन जोर्वे येथे हा उत्सव मोठ्या उत्साहात आणि परंपरेने साजरा केला जातो.”
दरम्यान, पूजा, नैवेद्य आणि वाद्यांच्या गजरात पार पडलेल्या या सोहळ्याने जोर्वे परिसरात पारंपरिक सणाचा उत्साह दिसून आला.