संगमनेरसाठी २ ते ३ दिवसांत आवर्तनाचा निर्णय - आमदार अमोल खताळ
◻️ जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्याकडे पाठपुराव्याची शिष्टमंडळाला ग्वाही
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत तोकडे राहिल्याने उभी पिके धोक्यात आली असून, शेतकऱ्यांची पाण्याची गरज ओळखून तातडीने आवर्तन सुरू करावे, अशी ठाम मागणी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात पालकमंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका घेतली असून येत्या दोन ते तीन दिवसांत आवर्तनाबाबत ठोस निर्णय होईल, अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
तालुक्यात पावसाने प्रदीर्घ ओढ दिल्याने निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर विविध गावांतील शेतकरी शिष्टमंडळाने आमदार अमोल खताळ यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी शेती वाचवण्यासाठी तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी लावून धरली.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार खताळ म्हणाले, “पावसाअभावी शेती आणि पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या समस्येची पूर्ण जाणीव आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संगमनेर तालुक्यासाठी तात्काळ पाणी सोडण्याची मागणी केली आहे. यावर त्यांनी अनुकूल प्रतिसाद दिला असून, लवकरच निर्णय जाहीर होईल.”
दरम्यान, यंदा धरण क्षेत्रात समाधानकारक पाणीसाठा झाला असला, तरी प्रत्यक्ष लाभक्षेत्रात अपेक्षित पाऊस न पडल्याने खरीप पिके करपण्याच्या मार्गावर आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्यातून नियोजनबध्द पध्दतीने पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे आवर्तन सोडून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी स्पष्ट भूमिका जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना मांडल्याचे आमदार अमोल खताळ यांनी नमूद केले.