जिल्हा बॅकेची निवडणूक ‘बिनविरोध’ करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत?
◻️ संगमनेरच्या बैठकीत बाळासाहेब थोरात, सुजय विखेंसह जिल्ह्यातील सर्वपक्षीय दिग्गज हजर
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज संगमनेर येथे जिल्ह्यातील सर्वपक्षीय प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. सध्या जिल्ह्यात निर्माण झालेली गंभीर दुष्काळी परिस्थिती, शेतकरी व सहकार समोरील आव्हाने लक्षात घेता, परस्पर राजकीय मतभेद बाजूला ठेवून जिल्हा बॅकेची आगामी निवडणूक पूर्णपणे बिनविरोध करण्याचा एकमुखी आणि ऐतिहासिक निर्धार या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केल्याची माहिती समोर आली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक ही केवळ एक वित्तीय संस्था नसून ती जिल्ह्यातील शेतकरी, प्राथमिक विविध कार्यकारी सेवा संस्था आणि संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा भक्कम आधारस्तंभ आहे. बॅकेने आजवर सहकाराची निकोप आणि राजकारणविरहित वाटचाल जपली असून ही निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा समविचारी नेत्यांनी यापूर्वीही अनेकदा जपली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण होणारी अनावश्यक राजकीय चुरस, स्पर्धा आणि कटुता टाळून बॅकेचे कामकाज अधिक सक्षम, पारदर्शक व प्रभावीपणे पुढे नेणे आणि ग्रामीण अर्थकारणाला गती देणे ही काळाची गरज असल्याचे मत बैठकीत उपस्थित नेत्यांनी ठामपणे मांडले.
या महत्त्वपूर्ण बैठकीस जिल्ह्याच्या राजकारणातील विविध विचारसरणीचे नेते एकाच मंचावर उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार आशुतोष काळे, आमदार संग्राम जगताप, आमदार हेमंत ओगले, आमदार विवेक कोल्हे, आमदार विक्रम पाचपुते, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार काशिनाथ दाते आणि आमदार अक्षय कर्डिले यांचा समावेश होता. याशिवाय श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाने, श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते व प्रतापसिंह पाचपुते यांनीही बैठकीस उपस्थित राहून चर्चा केली. तसेच आमदार मोनिका राजळे आणि बॅकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी ऑनलाइन माध्यमातून सहभाग नोंदवून या ‘बिनविरोध’ भूमिकेला आपला सक्रिय पाठिंबा जाहीर केला.
दरम्यान, पूर्वनियोजित कार्यक्रमांच्या व्यस्ततेमुळे अथवा संपर्काअभावी जे प्रमुख नेते आजच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांच्याशी पुढील दोन ते तीन दिवसांत समन्वय साधला जाणार आहे. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राच्या आणि बळीराजाच्या व्यापक हितासाठी सर्वांना विश्वासात घेऊन सामंजस्याचे व सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा सामूहिक निर्णय घेऊन बैठकीची सांगता करण्यात आली. तर, जिल्हा बॅकेची निवडणूक ‘बिनविरोध’ होते का? हे अधिकृत घोषणा झाल्यानंतरचं स्पष्ट होणार आहे.