अश्विन आयुर्वेद रुग्णालयात ९२ ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
◻️औषधोपचारासह पंचकर्माचा ज्येष्ठांनी घेतला लाभ
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | मांचीहिल (ता. संगमनेर) येथील अश्विन रुरल आयुर्वेद रुग्णालयात संगमनेर ज्येष्ठ नागरिक संघाच्या ९२ ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर नुकतेच उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात विविध व्याधींनी ग्रस्त असणाऱ्या ज्येष्ठांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने मोफत उपचार केले.
या शिबिरामध्ये सांधेदुखी, वात-पित्त विकार, गुडघे व कंबरदुखी, नेत्ररोग, कान-नाक-घसा विकार, त्वचारोग तसेच पोटाच्या विकारांची सखोल तपासणी करून मोफत औषधोपचार देण्यात आले. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजन कुलकर्णी, डॉ. अविनाश जाधव व डॉ. ज्योती खंदारे यांनी रुग्णांची तपासणी केली.
तसेच स्त्रीरोग विभागात डॉ. अमोल जगताप, शल्य विभागात डॉ. शिवपाल खंडीझोड, कान-नाक-घसा विभागात डॉ. वावरे तर नेत्र विभागात प्रसिध्द नेत्रतज्ज्ञ डॉ. जैनेंद्र राहुड व तंत्रज्ञ रोहित मते यांनी सेवा दिली. पंचकर्म विभागात डॉ. निशांत इंगळे यांनी रुग्णांवर अग्निकर्म व विध्दकर्म उपचार केले. एक्स-रे तपासणीचे कामकाज योगेश मोरे तर पॅथॉलॉजीचे काम जयश्री गुंजाळ व हिरा खेमनर यांनी पाहिले.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक ॲड. शाळीग्राम होडगर, उपाध्यक्ष अण्णासाहेब बलमे, प्राचार्या डॉ. श्यामल निर्मळ, संगमनेर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सोमनाथ कळसकर गुरुजी, ज्ञानेश्वर गोंडे, जी. पी. शेख यांच्यासह ज्येष्ठ संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, शिबिराच्या यशस्वीतेसाठी रुग्णालयाचे संचालक दत्ता शिंदे, डॉ. शुकाचार्य वाघमोडे, पदवीधर विद्यार्थी व सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.