भिंगार कॅटोन्मेंट क्षेत्रात अखेर ‘२ एफएसआय’ला मंजुरी!

संगमनेर Live
0
भिंगार कॅटोन्मेंट क्षेत्रात अखेर ‘२ एफएसआय’ला मंजुरी!

◻️ डॉ. सुजय विखे पाटलांच्या लोकसभेतील पाठपुराव्याला यश; संरक्षण मंत्रालयाकडून राजपत्र जारी


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | भिंगार कॅटोन्मेंट परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या प्रलंबित आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नाला अखेर मोठे यश मिळाले आहे. संरक्षण मंत्रालयाने भिंगार कॅटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात २ एफएसआयला मंजुरी दिली असून, यासंदर्भातील सुधारित राजपत्र अधिसूचना अधिकृतपणे जारी केली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे भिंगारमधील बांधकामांवर असलेले जुने निर्बंध संपुष्टात आले असून, हजारो मिळकतधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

​आतापर्यंत भिंगार कॅटोन्मेंट क्षेत्रात केवळ १ एफएसआय लागू असल्याने उपलब्ध जागेवर गरजेनुसार मजले किंवा अतिरिक्त खोल्या बांधण्यावर कडक बंधने होती. परिणामी वाढती कुटुंबे, काळाच्या ओघात बदललेल्या गरजा आणि अपुऱ्या जागेमुळे अनेक मिळकतधारक मोठ्या अडचणीत सापडले होते. आता एफएसआय थेट दुप्पट झाल्याने सुमारे २५ हजारांहून अधिक नागरी लोकसंख्येला स्वतःच्या जागेत नियमानुसार हक्काचे अधिक बांधकाम करणे शक्य होणार असून, कडक नियमांमुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या नागरी विकासालाही मोठी गती मिळणार आहे.

​भिंगारमधील नागरिकांना एफएसआय मर्यादा, बांधकामासाठी लागणारे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी), पाणीपुरवठा आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींकडे तत्कालीन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ७ डिसेंबर २०२३ रोजी थेट लोकसभेत आवाज उठवून सभागृहाचे लक्ष वेधले होते. कॅटोन्मेंटच्या नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कॅटोन्मेंट क्षेत्र अहिल्यानगर महानगरपालिकेत समाविष्ट करण्यासह एफएसआय वाढीची ठाम मागणी त्यांनी संरक्षण मंत्रालयाकडे सातत्याने केली होती.

​या महत्त्वाच्या निर्णयासाठी केवळ राजकीय पातळीवरच नव्हे, तर कॅटोन्मेंट बोर्डाच्या प्रशासकीय पातळीवरही सातत्यपूर्ण प्रयत्न झाले. बोर्डाचे तत्कालीन मुख्याधिकारी मोरे आणि नामनिर्देशित सदस्य वसंत राठोड यांनी बिल्डिंग बायलॉजमध्ये दुरुस्तीचा ठराव मंजूर करून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी केंद्र व राज्य पातळीवर संयुक्तपणे प्रभावी पाठपुरावा केला. संरक्षण मंत्रालयाने या सर्व बाबींचा सकारात्मक विचार करून अखेर २ एफएसआयच्या सुधारित अधिसूचनेवर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, ​हा निर्णय भिंगारच्या नियोजित आणि सर्वांगीण नागरी विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्यासह कॅटोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर पी. सुनीलकुमार, मुख्याधिकारी प्रिया पुरोहित, अभियंता अशोक फुलसुंदर आणि प्रवीण बागल यांचे भिंगारवासीयांच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !