पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; ऑगस्टपर्यंत पाणी आरक्षित ठेवा!

संगमनेर Live
0
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; ऑगस्टपर्यंत पाणी आरक्षित ठेवा!

◻️ पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या राहुरी येथील टंचाई आढावा बैठकीत सूचना 


संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संभाव्य दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन आगामी ऑगस्ट महिन्यापर्यंत पिण्याचे पाणी आरक्षित ठेवावे आणि त्यानंतर शिल्लक राहणाऱ्या पाण्याचे शेतीसाठी काटेकोर व सूक्ष्म नियोजन करण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. सध्याच्या टंचाईच्या काळात शासकीय यंत्रणेने अधिक संवेदनशीलतेने आणि तत्परतेने काम करावे; कामात दिरंगाई अथवा हयगय आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

राहुरी येथे पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तालुका टंचाई आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार अक्षय कर्डिले, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

​पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित करताना पालकमंत्री म्हणाले की, पाणी संवर्धनासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनीही एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. निळवंडे तसेच मुळा धरणातील उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन केले जाणार असून कालव्यातून पाणी सोडल्यानंतर पाण्याची कुठेही गळती होणार नाही, याची दक्षता जलसंपदा विभागाने घ्यावी. याशिवाय मुळा धरणातील गाळ काढण्याबाबत लवकरच ठोस कार्यवाही सुरू करण्यात येईल, तसेच कालवा लाभक्षेत्रात (कमांड एरिया) चारा लागवडीसाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी नमूद केले.

​बैठकीत शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्यांची गंभीर दखल घेत पालकमंत्र्यांनी ग्रामसेवक आणि तलाठ्यांना थेट सूचना केल्या. शेतकऱ्यांच्या अडचणी व मागण्यांची तात्काळ दखल घेऊन त्यावर विनाविलंब उपाययोजना कराव्यात आणि केलेल्या कार्यवाहीचा वस्तुनिष्ठ अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. यासोबतच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महावितरणने शेतीसाठीच्या वीजपुरवठ्याचे निश्चित वेळापत्रक तयार करून त्याची काटेकोर व प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी तंबीही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

​दरम्यान, या बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी तालुक्यातील गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. आमदार प्राजक्त तनपुरे यांनी तालुक्यातील जलजीवन मिशनअंतर्गत रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली, जेणेकरून गावागावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. तसेच शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी शेतीपंपांना नियमित व अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवावा, असा आग्रह त्यांनी धरला. 

तर दुष्काळी परिस्थिती पाहता तालुक्यातील पिकांचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत, अशी ठाम मागणी आमदार अक्षय कर्डिले यांनी केली. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांना सौरऊर्जा पॅनेल्स बसवून विजेची बचत करावी, शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाबाबत दिलासादायक निर्णय घ्यावा तसेच वंचित राहिलेल्या गावांचा उपसा जलसिंचन योजनांमध्ये समावेश करून पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणीही आमदार कर्डिले यांनी लावून धरली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !