टंचाई परिस्थिती संधी समजून प्रकल्पांच्या पायाभूत सुविधा पूर्ण करा - मंत्री विखे पाटील

संगमनेर Live
0
टंचाई परिस्थिती संधी समजून प्रकल्पांच्या पायाभूत सुविधा पूर्ण करा - मंत्री विखे पाटील


◻️ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या पायाभूत सुविधांचा घेतला आढावा


संगमनेर LIVE (लोणी) | प्रवरा, मुळा आणि गोदावरी लाभक्षेत्रात जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सुरू असलेली सर्व कामे मिशन मोडवर पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. ताजनापूरबाबत लवकरच बैठक घेणार असून, सध्याची टंचाई परिस्थिती ही संधी समजून प्रकल्पांच्या पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्याचे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरण समूहात सुरू असलेल्या कामांचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथील सिंचन भवन कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये घेतला. नदीजोड प्रकल्पाची माहिती त्यांनी जाणून घेतली.

बैठकीस मराठवाडा गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी, मुख्य अभियंता अरुण नाईक, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, नदीजोड प्रकल्पाचे गणेश हारदे, मनोज ढोकचौळे, अनिल सूर्यवंशी, गोदावरी प्रकल्पाच्या अभियंता सोनल शहाणे, मुळा प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, भंडारदरा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे, निळवंडे प्रकल्पाचे अमोल कवडे, प्रदीप हापसे तसेच ताजनापूर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांतर्गत कामांची माहिती जाणून घेतली. सद्य:स्थितीत वांबोरी चारीच्या दुसऱ्या टप्प्याच्या ऊर्ध्वगामी नलिकेचे काम पूर्ण झाले असून, गुरुत्ववाहिनी नलिकेचे काम ४० टक्के पूर्ण झाले असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. कामाला गती देण्याबाबत अधिकाऱ्यांनी अतिशय गांभीर्याने निर्णय करून डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे मंत्री विखे पाटील यांनी सूचित केले.

निळवंडे डावा आणि उजवा कालव्यावरील शाखा कालव्यांच्या अस्तरीकरणाचे काम सतरा टक्के पूर्ण झाले आहे. बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे काम तीस टक्के पूर्ण झाले असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. सर्व कामे जून २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना मंत्र्यांनी बैठकीत दिल्या. जिल्ह्यातील ताजनापूरच्या प्रकल्पाचा आराखडा जाणून घेत प्रश्नाबाबत बैठक आयोजित केली असल्याचे त्यांनी सांगितले.

नदीजोड प्रकल्प व वळण योजनांच्या कामाचा आढावाही बैठकीत घेण्यात आला. उल्हास-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पासाठी सर्वेक्षण आणि प्रकल्प अहवाल तयार करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, लवकरच नदीजोड प्रकल्पाच्या लाभक्षेत्राची पाहणी अधिकाऱ्यांसमवेत करणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !