शिक्षणातील यश अनेक पिढ्या घडवते - डॉ. सुजय विखे पाटील
◻️ संगमनेर तालुक्यातील स्पर्धा परीक्षांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | “तुमच्यासाठी एमपीएससी-यूपीएससी ही परीक्षा आहे, तर आमच्यासाठी निवडणूक ही परीक्षा असते. अपयशानंतर जिद्दीने पुन्हा यश खेचून आणणे हीच खरी ताकद आहे. राजकारणासाठी कर्जबाजारी होण्यापेक्षा आई-वडिलांचे कल्याण आणि मुलांच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्या. सरपंच, आमदार किंवा खासदार एकच होऊ शकतो; परंतु मुलांच्या शिक्षणातून मिळालेले यश संपूर्ण कुटुंबाला आणि अनेक पिढ्यांना पुढे नेते,” असे मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.
संगमनेर तालुक्यातील भगवतीमाळ-खंदरमळा येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी), विविध स्पर्धा परीक्षा तसेच पोलीस भरतीत निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर नागरी सत्कार सोहळा पार पडला. यावेळी ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रशांत आहेर होते, तर आमदार अमोल खताळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संयोजन जनार्दन आहेर यांनी केले होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा पाया मजबूत असल्याशिवाय त्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकत नाही, यावर भर देत डॉ. विखे पाटील म्हणाले, “गावाच्या इतर विकासकामांसोबतच शाळांच्या मूलभूत गरजांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. शाळा खोल्या, संगणक कक्ष, डिजिटल बोर्ड, मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि शुध्द पिण्याचे पाणी या सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. संगमनेर तालुक्यातील शाळांचे सक्षमीकरण करण्यासाठी पुढील काळात ठोस पावले उचलली जातील.”
तसेच, ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची दर्जेदार तयारी करता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दरवर्षी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
स्थानिक सबस्टेशनच्या प्रलंबित प्रश्नावर बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, “मला जनतेला खोटी आश्वासने देण्याची सवय नाही. जे काम शक्य आहे त्यालाच ‘हो’ म्हणायचे आणि अशक्य असेल तर स्पष्ट ‘नाही’ सांगायचे, ही माझी कार्यपध्दती आहे. मी आमदार अमोल खताळ यांच्या वतीने आणि स्वतःच्या वतीने शब्द देतो की, या भागातील सबस्टेशनचा प्रश्न येत्या एका वर्षाच्या आत मार्गी लावला जाईल.”
आपल्या भाषणाचा समारोप करताना डॉ. विखे पाटील यांनी नमूद केले की, संघर्ष करून प्रशासकीय सेवेत गेलेली हीच मुले उद्या महत्त्वाच्या पदांवर काम करतील. लोकप्रतिनिधी म्हणून योजना आणताना प्रशासनातील संवेदनशील अधिकाऱ्यांची साथ महत्त्वाची असते. त्यामुळे ‘हा माझा परिसर आहे’ या आत्मीयतेने ही मुले भविष्यात आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान बोलताना आमदार अमोल खताळ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “स्पर्धा परीक्षांमधील यश हे एका रात्रीत मिळत नसते; त्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत, योग्य नियोजन आणि अपयशातून पुन्हा उभे राहण्याची मानसिकता लागते. विद्यार्थ्यांनी या यशावर न थांबता पुढील मोठी ध्येये निश्चित करावीत आणि आपल्या भागाचे नाव देशात उज्ज्वल करावे.”
दरम्यान, कार्यक्रमात एमपीएससी व पोलीस भरतीत निवड झालेल्या सर्व गुणवंतांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी भगवतीमाळ, खंदरमळा आणि परिसरातील ग्रामस्थ, महिला, तरुण व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.