उद्या लोणीत प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य रोजगार मेळावा

संगमनेर Live
0
उद्या लोणीत प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य रोजगार मेळावा

◻️​नामांकित कंपन्यांमध्ये थेट मुलाखतीतून नोकरीची संधी

​संगमनेरLIVE (अनिल शेळके) | ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी थेट उपलब्ध करून देण्यासाठी लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणी येथे उद्या, मंगळवार दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्या सहभागी होणार असून तरुणांना जागेवरच थेट मुलाखती देऊन तत्काळ नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. राज्याचे कौशल्य विकास व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून हा रोजगार महाकुंभ आयोजित करण्यात आला आहे.

​या रोजगार मेळाव्याचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील आणि सहसचिव भारत घोगरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली.

​मेळाव्याचे स्वरूप स्पष्ट करताना संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील म्हणाल्या की, प्रवरा संस्थेने नेहमीच कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य दिले असल्याने संस्थेचे विद्यार्थी प्लेसमेंटमध्ये सातत्याने आघाडीवर राहिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर आयोजित या महाकुंभात दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर तसेच पदव्युत्तर अशा सर्व शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीच्या विपुल संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. केवळ नोकरीच नव्हे, तर कौशल्य विकास प्रशिक्षण, शिकाऊ उमेदवारी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ‘स्टार्टअप व उद्योजकता मार्गदर्शन कक्ष' देखील या ठिकाणी कार्यरत राहणार आहे.

दरम्यान, ​या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आयोजकांनी उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मेळाव्याच्या दिवशी उमेदवारांनी आपल्या मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह त्यांच्या साक्षांकित प्रती आणि अद्ययावत बायोडेटा सोबत ठेवावा. परिसरातील सर्व पात्र सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या थेट मुलाखतींच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !