मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्या!
◻️अहिल्यानगर जिल्हा काॅग्रेसतर्फे श्रीरामपूर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संशयास्पद कार्यपध्दतीवर आणि स्वायत्ततेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी अहिल्यानगर जिल्हा काॅग्रेस कमिटी (ग्रामीण उत्तर) च्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी यांना पक्षाच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.
काॅग्रेसने दिलेल्या निवेदनात निवडणूक आयोगाच्या अंतर्गत कामकाजावर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्रसिध्द झालेल्या वृत्ताचा दाखला देत काॅग्रेसने नमूद केले की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि अन्य दोन निवडणूक आयुक्त यांच्यात विविध निर्णयांवरून मोठे मतभेद निर्माण झाले होते. अन्य आयुक्तांच्या मतांकडे दुर्लक्ष करून मुख्य निवडणूक आयुक्तांनी मनमानी व एकतर्फी निर्णय घेतल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
मतदार याद्यांच्या विशेष पुनरावलोकन मोहिमेत मोठ्या प्रमाणावर पात्र मतदारांची नावे पध्दतशीरपणे वगळली जात असल्याचा दावा करत, पात्र नागरिकाला मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवणे हा लोकशाही प्रक्रियेवरील सुनियोजित आघात असल्याचे काॅग्रेसने म्हटले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सातत्याने मांडलेल्या ‘वोट चोरी’च्या मुद्द्याची गांभीर्याने दखल घेऊन निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, निष्पक्षता आणि उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा तत्काळ राजीनामा घेण्यात यावा, त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या सर्व संशयास्पद निर्णयांची उच्चस्तरीय कायदेशीर चौकशी व्हावी, तसेच निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रभाव टाकणाऱ्या बाह्य घटक किंवा व्यक्तींचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि आयोगाच्या एकूण कारभाराची वस्तुस्थिती श्वेतपत्रिकेद्वारे जनतेसमोर आणावी, अशी ठाम मागणी काॅग्रेसने या निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, याप्रसंगी काॅग्रेसचे उत्तर जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेसच्या सचिव सौ. प्रभावती घोगरे, संगमनेर तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, कार्याध्यक्ष अमोल शेलकर, अभिजित लुनिया यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.