‘नेक्स्ट आयुष' सक्तीविरोधात वैद्यकीय विद्यार्थ्यांनी घेतली बाळासाहेब थोरातांची भेट
◻️राज्य सरकार व आरोग्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यची थोरात यांची ग्वाही
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | बीएएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस या पारंपरिक वैद्यकीय शाखांमधून २०२१-२२ नंतर पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लादण्यात आलेली ‘नेक्स्ट आयुष’ राष्ट्रीय पात्रता व परवाना परीक्षा तत्काळ रद्द करावी, या मागणीसाठी तालुक्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी तीव्र एल्गार पुकारला आहे.
या अन्यायकारक निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत संगमनेरमधील विविध वैद्यकीय महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ कॅग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित या संवेदनशील प्रश्नावर सरकारने कोणताही हट्टाग्रह न धरता संवादातून तातडीने तोडगा काढावा, अशी आग्रही मागणी बाळासाहेब थोरात यांनी या वेळी केली.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर ही भेट पार पडली. यामध्ये इथापे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, गुंजाळ होमिओपॅथिक महाविद्यालय, रुक्मिणी आयुर्वेदिक महाविद्यालय, अश्विन आयुर्वेदिक महाविद्यालय, डेरी आयुर्वेदिक महाविद्यालय आणि सिध्दकला आयुर्वेदिक महाविद्यालय या महाविद्यालयांतील शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनींनी एकत्र येत सरकारच्या या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला.
२०२१-२२ च्या बॅचनंतर पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा सक्तीची केल्याने विद्यार्थी तसेच प्रत्यक्ष आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांमध्ये प्रचंड संभ्रम आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पदवी पूर्ण केल्यानंतर पुन्हा अशा प्रकारची परीक्षा लादणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळण्यासारखे आहे. या अन्यायाविरोधातील संघर्षाची सुरुवात संगमनेरमधून झाली असून शासनाने ही सक्ती मागे न घेतल्यास तालुका, जिल्हा आणि थेट राज्यस्तरावर सर्व विद्यार्थ्यांना संघटित करून तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी विद्यार्थ्यांनी दिला.
“वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न अत्यंत संवेदनशील आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याशी निगडित आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या अडचणी व व्यथा समजून घेऊन संवादाच्या माध्यमातून मार्ग काढण्याची गरज आहे. या प्रश्नावर आपण स्वतः राज्य सरकारमधील आरोग्यमंत्री तसेच संबंधित खात्यांच्या मुख्य सचिवांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांचा सकारात्मक व ठोस पाठपुरावा करू.” अशी ग्वाही माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विद्यार्थ्यांना दिली.