सुरुवातीला पॅकेजपेक्षा कौशल्याला प्राधान्य द्या - सौ. शालिनीताई विखे
◻️लोणी येथे ‘रोजगार महाकुंभ' मध्ये ५५ नामांकित कंपन्यांकडून ५ हजार युवकांची नोंदणी
संगमनेर LIVE (लोणी) | “कौशल्याधारित शिक्षण ही काळाची गरज बनली असून, देशातील तरुण पिढीला कौशल्याच्या जोरावर सक्षम करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. नोकरीच्या सुरुवातीला केवळ ‘सॅलरी पॅकेज'चा विचार न करता अनुभव, कौशल्य, नेतृत्वगुण आणि स्वतःची क्षमता सिध्द करण्याला प्राधान्य द्या. सुरुवातीचा हा अनुभवच भविष्यातील उज्ज्वल कारकिर्दीची भक्कम पायाभरणी करतो,” असा सल्ला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प' अभियानांतर्गत राज्य शासनाचा कौशल्य विकास विभाग आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभा'चे आयोजन करण्यात आले होते. लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडलेल्या या भव्य मेळाव्याचे उध्दघाटन सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
जिल्ह्यातील औद्योगिक विकासाचा संदर्भ देताना सौ. विखे पाटील म्हणाल्या की, “अहिल्यानगर जिल्ह्यात पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष पुढाकारातून औद्योगिकीकरणाला मोठी गती मिळाली आहे. संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या नामांकित ‘निबे ग्रुप'च्या माध्यमातून शिर्डी व हरेगाव परिसरात सुमारे ५ हजार स्थानिक युवकांसाठी रोजगाराची नवी दालने खुली होत आहेत. शासनस्तरावर उद्योग जगताला भक्कम प्रोत्साहन मिळत असल्याने तरुणांनी नव्या युगाची कौशल्ये आत्मसात करून स्वतःचे स्थान निर्माण करावे."
या रोजगार महाकुंभात देशातील ५५ हून अधिक राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय नामांकित कंपन्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. दिवसभरात ५ हजारांपेक्षा जास्त तरुण-तरुणींना थेट उद्योगक्षेत्राशी जोडून त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट या उपक्रमातून साध्य करण्यात आले. यामध्ये आयटीआय, पदविका (डिप्लोमा), अभियांत्रिकी तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या हजारो होतकरू उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात आल्या. विशेषतः ग्रामीण भागातील युवक आणि वंचित घटकांसह महिलांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा महाकुंभ अत्यंत फलदायी ठरला.
कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश उगले यांनी शासनाच्या कौशल्य विकासाभिमुख धोरणांवर प्रकाश टाकला. राज्यभरात कौशल्याधारित शिक्षणातून प्रत्यक्ष रोजगारनिर्मितीवर भर दिला जात असून हा मेळावा ग्रामीण भागातील तरुणांच्या भविष्याला नवी दिशा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संस्थेचे शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे यांनी प्रवरा संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचा पुनरुच्चार करताना वंचित व गरजू घटकांतील विद्यार्थ्यांना रोजगाराशी जोडण्याच्या भूमिकेचा उल्लेख केला, तर प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी मेळाव्याच्या यशस्वी नियोजनाचा आढावा मांडला.
दरम्यान, या भव्य रोजगार मेळाव्यास संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, कार्यक्रम समन्वयक डॉ. अण्णासाहेब वराडे यांच्यासह उद्योजक प्रतिनिधी, प्राध्यापक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.