विघ्नहर्त्याने महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करावे - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
विघ्नहर्त्याने महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करावे - बाळासाहेब थोरात 

◻️​१३१ वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या सोमेश्‍वर गणपतीचे पूजन


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | “संपूर्ण महाराष्ट्रात सध्या डीजे बंदीबाबत जोरदार चर्चा सुरू असताना, संगमनेरच्या मानाच्या सोमेश्‍वर गणेश मंडळाने तब्बल २२ वर्षांपूर्वी म्हणजेच २००२ मध्येच डीजे आणि गुलालाला फाटा देऊन संपूर्ण राज्यापुढे एक पुरोगामी व शांतताप्रिय आदर्श निर्माण केला आहे. यावर्षी राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी सावटातून बळीराजाला बाहेर काढण्यासाठी विघ्नहर्त्याने भरपूर पाऊस पाडून सर्व नागरिकांना सुखी-समाधानी करावे,” अशी प्रार्थना काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.

​रंगार गल्ली येथील १३१ वर्षांची समृध्द आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मानाच्या सोमेश्‍वर गणपतीचे पारंपारिक पद्धतीने पूजन बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

​पुरोगामी विचार आणि शिस्तीची मोठी परंपरा
​उपस्थितांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, “सोमेश्‍वर गणपतीच्या पूजनाचा मान अनेक वर्षांपासून सकाळीच आम्हाला मिळतो, ही समाधानाची बाब आहे. या मंडळाने उत्सव साजरा करताना सामाजिक भान कायम जपले आहे. अत्यंत शिस्तबध्द मिरवणूक, पारंपारिक वाद्ये आणि मैदानी खेळ हे या मंडळाचे खास वैशिष्ट्य राहिले आहे. चांगल्या कामाच्या पाठीशी समाज नेहमीच ठामपणे उभा राहतो, हेच सोमेश्‍वर मंडळाने आपल्या कार्यांतून सिध्द केले आहे.”

​राज्यातील पर्जन्यमानावर चिंता व्यक्त करताना थोरात म्हणाले, “ईश्‍वरकृपेने संगमनेरची धरणे भरल्याने शहराला पाणी मिळत असले, तरी ग्रामीण भागात आणि राज्यभरात पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाला आहे. आगामी सणासुदीचा काळ सर्वांना आनंदाचा जावा आणि विघ्नहर्त्या गणरायाच्या आशीर्वादाने उर्वरित काळात मुबलक पाऊस पडून महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हावा, हीच आजच्या दिनी चरणी प्रार्थना आहे.” असे नमूद केले.

​गणेशोत्सवाच्या या मंगलप्रसंगी पारंपारिक खेळांचे जतन करण्याच्या उद्देशाने लाठीकाठी, शिवकालीन मर्दानी खेळ आणि विविध मैदानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. उपस्थित नागरिकांनी या प्रात्यक्षिकांना उत्स्फूर्त दाद दिली.

दरम्यान, ​या मंगल सोहळ्यास आमदार सत्यजीत तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे आणि डॉ. जयश्री थोरात उपस्थित होते. त्यांनीही संगमनेरकरांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. 

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्रशासकीय अधिकारी, सोमेश्‍वर मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच संगमनेर शहरातील नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !