देवापुढे कोणीही मोठा किंवा छोटा नसतो - आमदार अमोल खताळ
◻️ महाआरती नंतर मानाच्या सोमेश्वर गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | “सोमेश्वर मित्र मंडळाच्या मानाच्या गणपतीपेक्षा कोणीही मोठा नसतो. आपण सर्वजण ज्या आराध्याला नतमस्तक होतो, त्या देवाच्या पुढे कोणीही मोठा किंवा लहान नसतो; देवाच्या दृष्टीने सर्व समान असतात," असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले. १३१ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या रंगारगल्ली येथील मानाच्या सोमेश्वर तरुण मित्र मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या प्रारंभी ते बोलत होते.
शुक्रवारी सकाळी आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते श्रींची विधिवत महाआरती करण्यात आली. यानंतर ढोल-ताशांच्या गजर आणि जयघोषात भव्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला.
उपस्थितांशी संवाद साधताना आमदार खताळ म्हणाले, “सोमेश्वर मित्र मंडळाने १३१ वर्षांची परंपरा अखंडपणे जपली आहे. जीवनात राजकीय, सामाजिक वा इतर क्षेत्रांत मिळणाऱ्या संधीचे सोने करून पुढे जाणे महत्त्वाचे असते.” सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवर चिंता व्यक्त करत ते म्हणाले, “खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. मात्र, महायुतीचे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पूर्वीचा ओला दुष्काळ आणि सध्याचा कोरडा दुष्काळ यांसारख्या संकटांवर मात करत राज्य निश्चितच पुढे जाईल. बळीराजाच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि राज्यात दमदार पाऊस पडून शेतकरी सुखी व्हावा, अशी प्रार्थना आपण बाप्पाच्या चरणी केली आहे.”
या मंगलप्रसंगी प्रांताधिकारी अरुण उंडे, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो गणेशभक्त उपस्थित होते. मंडळाच्या वतीने आमदार अमोल खताळ आणि सौ. नीलम खताळ यांचा इच्छापूर्ती गणेशाची प्रतिमा देऊन सपत्नीक यथोचित सन्मान करण्यात आला.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान मर्दानी खेळांची सादर झालेली प्रात्यक्षिके मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरली. दांडपट्टा, चक्री आणि लाठीकाठीच्या चित्तथरारक कौशल्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. या उत्साही वातावरणात आमदार अमोल खताळ आणि सौ. नीलम खताळ यांनाही पारंपरिक खेळ खेळण्याचा मोह आवरला नाही. दोघांनीही हातात लाठी घेत ती लीलया गरगर फिरवली. लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या पत्नीने दाखवलेले हे लाठी फिरवण्याचे कौशल्य पाहून उपस्थित गणेशभक्तांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना उत्स्फूर्त दाद दिली.