अश्वी इंग्लिश स्कूल येथे उद्या ‘कर्मवीरा’च्या १३९ व्या जयंती सोहळ्याचे आयोजन
◻️ आमदार रोहित पवार, चंद्रकांत दळवी, अशोक बोरा राहणार उपस्थित
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त उद्या शनिवार, दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथील ‘अश्वी इंग्लिश स्कूल व शांताबाई मुळचंद बोरा कनिष्ठ महाविद्यालया’च्या प्रांगणात संस्थेचे विभागीय चेअरमन तथा आमदार रोहित पवार यांच्या हस्ते नूतन कनिष्ठ महाविद्यालय इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती प्र. प्राचार्य दीपक चव्हाण व प्र. पर्यवेक्षक रमेश थेटे यांनी दिली.
शाळेच्या प्रांगणात साकारत असलेल्या या कनिष्ठ महाविद्यालय इमारतीसाठी ॲड. अशोक मुळचंद बोरा यांनी मोठी देणगी दिली आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी हे राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून देणगीदार ॲड. अशोक मुळचंद बोरा उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन ॲड. भगिरथ शिंदे, उपाध्यक्ष अरुण कडू, मीनाताई जगधने, बाबासाहेब भोस, सुरेश बोळीज, ॲड. संदीप वर्पे, रावसाहेब म्हस्के, राजेंद्र चांदे, प्रकाश निकम, एकनाथ घोगरे, किरण कडू, नवनाथ बोडखे यांच्यासह पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, या दुग्धशर्करा योग साधणाऱ्या जयंती व भूमिपूजन सोहळ्यास पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि परिसरातील शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य सुमतीलाल गांधी, सतिश होडगर, गणेश गायकवाड, प्र. प्राचार्य दीपक चव्हाण, प्र. पर्यवेक्षक रमेश थेटे यांनी केले आहे.