५ हजार कोटींची गुंतवणुकीतून ४ हजार तरुणांना मिळणार रोजगार - पालकमंत्री विखे पाटील
◻️‘एव्हिएशन पार्क’चे हरेगावमध्ये भूमिपूजन संपन्न
संगमनेर LIVE (शिर्डी) | श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावच्या मातीत देशातील सर्वात मोठ्या ‘एव्हिएशन पार्क’ची उभारणी केली जात आहे. ‘निबे ग्रुपच्या माध्यमातून संरक्षण उत्पादन प्रकल्पाच्या माध्यमातून ४ हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
उद्योजक गणेश निबे यांनी घेतलेला हा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ऐतिहासिक असल्याचे सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागात तब्बल ५ हजार कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक येणार असून, स्थानिक स्तरावर ४ हजार पेक्षा जास्त तरुणांना थेट रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
हरेगाव येथे उभारले जाणारे देशातील सर्वात मोठे ‘एव्हिएशन पार्क’ जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात मैलाचा दगड ठरणार आहे. ‘आत्मनिर्भर भारत' संकल्पनेनुसार, पूर्वी परकीय देशांवर अवलंबून असलेली संरक्षण उत्पादने आता देशातच तयार होत असून, गणेश निबे यांच्यासारखा शेतकर्याचा मुलगा देशाच्या औद्योगिक नकाशावर नाव कोरत असल्याचा सार्थ अभिमान पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, याप्रसंगी उद्योजक गणेश निबे, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शासनाकडून या प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.