श्री सिध्देश्‍वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरू सुजयदादा’ लक्षवेधी देखावा

संगमनेर Live
0
श्री सिध्देश्‍वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरू सुजयदादा’ लक्षवेधी देखावा

◻️ उड्डाणपूल, पायाभूत सुविधांसह ‘ग्रीन सिटी’ची केली आकर्षक मांडणी


संगमनेर LIVE (​अहिल्यानगर) | उत्सवाच्या काळात केवळ धार्मिक वातावरण न ठेवता शहराच्या विकासाची दिशा आणि झालेला कायापालट नागरिकांसमोर मांडण्याचा स्तुत्य उपक्रम तोफखाना परिसरातील श्री सिध्देश्‍वर बाल मंडळाने हाती घेतला आहे. यंदा मंडळाच्या वतीने ‘विकासाचे महामेरू सुजयदादा’ हा माहितीपूर्ण आणि नावीन्यपूर्ण देखावा साकारण्यात आला असून, तो पाहण्यासाठी शहरवासीयांची मोठी गर्दी होत आहे.

​या देखाव्यात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर शहरात झालेल्या विविध विकासकामांचे वास्तवदर्शी दर्शन घडविण्यात आले आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहरात नव्याने उभारण्यात आलेले भव्य उड्डाणपूल, शहरांतर्गत दर्जेदार काॅक्रीट रस्त्यांचे जाळे आणि सुसज्ज प्रशासकीय इमारतीच्या देखण्या प्रतिकृती या देखाव्यात हुबेहूब साकारण्यात आल्या आहेत. यासोबतच शहरातील नवीन उद्याने, अखंड पाणीपुरवठा योजना, दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि विविध नागरी प्रकल्पांची सविस्तर माहिती देणारे दिशादर्शक फलक नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत असून, शहराच्या सुनियोजित विकासाचा संपूर्ण आलेख या माध्यमातून वाचकांसमोर उलगडण्यात आला आहे.

​केवळ सिमेंट-काॅक्रीटच्या पायाभूत सुविधांवर न थांबता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या पुढाकाराने राबवली जाणारी ‘नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहीम’ या उपक्रमाचाही देखाव्यात प्रभावी समावेश करण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सुरू असलेल्या या हरित मोहिमेचे महत्त्व छायाचित्रांसह स्वतंत्र कक्षात अधोरेखित करण्यात आले आहे.

​देखाव्याच्या मध्यभागी उभारण्यात आलेला ‘समृध्द अहिल्यानगर, विकसित महाराष्ट्र’ हा फलक शहराच्या भावी प्रगतीची दिशा स्पष्ट करतो. उत्सवाच्या माध्यमातून शहराच्या विकासाचा हा प्रवास आणि भविष्यातील विकासाचे व्हिजन सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत असून, देखाव्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !