माझा बळीराजा संकटात; संपूर्ण संगमनेर तालुक्यात दुष्काळी जाहीर करा!
◻️ कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे आमदार अमोल खताळ यांची आग्रही मागणी
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | चालू वर्षी पावसाने दिलेल्या मोठ्या खंडामुळे संगमनेर तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून शेतकरी अभूतपूर्व आर्थिक संकटात सापडला आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर प्रशासनाने केवळ कागदी अहवालांवर न थांबता संपूर्ण संगमनेर तालुका तत्काळ ‘दुष्काळी’ जाहीर करावा आणि बाधित शेतकऱ्यांना तातडीने थेट आर्थिक मदत द्यावी, अशी आग्रही मागणी आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली.
गुरुवारी (दि. २४) कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पावसाअभावी करपलेल्या सोयाबीन पिकांची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान आमदार अमोल खताळ यांनी स्थानिक शेतकऱ्यांसह कृषिमंत्र्यांची भेट घेऊन तालुक्यातील भीषण वास्तवाची जाणीव करून दिली. तालुक्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिकांची वाढ खुंटली असून सोयाबीन, मका, बाजरी तसेच कडधान्ये पाण्याअभावी शेतातच सुकून गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, उत्पादन शून्य होण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचा लागवड खर्चही पदरात पडणे कठीण झाले आहे.
यावेळी परिस्थितीचे गांभीर्य मांडताना आमदार खताळ यांनी प्रशासकीय दिरंगाईवर बोट ठेवले. ते म्हणाले की, तालुक्यातील परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत नाजूक होत चालली असून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून कागदी अहवाल तयार न करता प्रत्यक्ष शेतातील नुकसानीचे वास्तव जाणून घ्यावे. शासनाने केवळ मोजक्या किंवा निवडक गावांचा विचार न करता संपूर्ण संगमनेर तालुक्याचा सर्वंकष आढावा घ्यावा. पावसाची मोठी तूट आणि पिकांची झालेली नासाडी लक्षात घेऊन संपूर्ण तालुका तात्काळ दुष्काळी घोषित करण्यात यावा.
त्याचबरोबर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कोणताही विलंब न लावता थेट शासकीय आर्थिक सानुग्रह मदत द्यावी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्ज व वीजबिल सवलतींसारख्या उपाययोजना युध्दपातळीवर राबवाव्यात, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.
या पाहणी दौऱ्यावेळी कृषिमंत्र्यांसमवेत स्थानिक शेतकरी, विविध लोकप्रतिनिधी आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.