लवाजमा बाजूला ठेवूनआमदारांच्या दुचाकीवरून पालकमंत्र्यांच्या भेटीगाठी!
◻️ मंत्री विखे पाटलांकडून शहरात गणपती दर्शन आणि आरती
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | गणेशोत्सवाच्या मंगलमयी वातावरणात जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शासकीय वाहनांचा ताफा आणि राजशिष्टाचाराचा लवाजमा पूर्णपणे बाजूला ठेवत, अत्यंत साधेपणाने थेट गणेशभक्तांमध्ये मिसळण्याचा सुखद अनुभव संगमनेरकरांना दिला.
विशेष म्हणजे, स्थानिक आमदार अमोल खताळ पाटील स्वतः दुचाकी चालवत होते, तर पालकमंत्री विखे पाटील त्यांच्या मागे बसून शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी देण्यासाठी निघाले होते. एरवी मंत्र्यांचा दौरा म्हटला की सायरन वाजवणाऱ्या गाड्या, पोलिसांचा ताफा आणि शासकीय औपचारिकतेची गर्दी पाहायला मिळते; मात्र बाप्पाच्या चरणी लीन होताना त्यांनी या सर्व ‘व्हीआयपी संस्कृती'ला पूर्णपणे फाटा दिला. कोणत्याही विशेष ताफ्याशिवाय साधेपणाने रस्त्यावरून दुचाकीवर निघालेल्या या दोन्ही लोकप्रतिनिधींना पाहून उपस्थित नागरिक आणि भाविकांमध्ये मोठे कुतूहल व उत्साह पाहायला मिळाला.
या दौऱ्यादरम्यान दोन्ही नेत्यांनी संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौक मित्र मंडळ, सुतार गल्ली मित्र मंडळ, नेहरू चौक मित्र मंडळ, जय जवान चौक मित्र मंडळ, विद्यानगर तरुण मित्र मंडळ आणि आमदार अमोल खताळ पाटील तरुण मित्र मंडळासह सुकेवाडी येथील प्रसिध्द महागणपती तसेच महावितरण कंपनी परिसरातील शम्मी गणपतीचे मनोभावे दर्शन घेऊन भक्तिभावाने महाआरती केली. प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी पोहोचताच विखे पाटील आणि आमदार खताळ यांनी हात जोडून गणेशभक्त आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पालकमंत्र्यांनी कार्यकर्त्यांशी आस्थेने संवाद साधत त्यांच्या उत्सवातील सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती जाणून घेतली. कोणत्याही पदाचा बडेजाव न मिरवता थेट दुचाकीवर स्वार होऊन घेतलेल्या या भेटीमुळे गणेशभक्तांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, लोकप्रतिनिधी आणि जनतेमधील अंतर कमी करणारा हा प्रसंग यंदाच्या संगमनेर गणेशोत्सवातील सर्वात लक्षवेधी आणि कौतुकास्पद क्षण ठरला आहे.