‘सिध्दिविनायक मंडळा’ने सामाजिक उपक्रमांनी साजरा केला गणेशोत्सव
◻️ प्रतापपूर येथे आरोग्य शिबिर, वृक्षारोपण आणि चित्रपटाची मेजवानी
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | उत्सवातील केवळ देखावे आणि अवाजवी खर्चाला फाटा देत, सामाजिक बांधिलकी जपत प्रतापपूर (ता. संगमनेर) येथील सिध्दिविनायक गणेशोत्सव मंडळाने यंदाचा गणेशोत्सव अत्यंत स्तुत्य उपक्रमांनी साजरा केला. उत्सव काळात मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण आणि धार्मिक चित्रपटाचे प्रदर्शन अशा विविध विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गावातील नागरिकांना गावातच आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने मंडळाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात गावातील तब्बल ४५ नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक तो वैद्यकीय सल्ला देण्यात आला.
सामाजिक कर्तव्यासोबतच पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी मंडळाच्या पटांगणात तसेच गावातील शाळेच्या आवारात ३० वृक्षांची लागवड करण्यात आली. केवळ वृक्षारोपण न करता या झाडांचे संवर्धन आणि संगोपन करण्याचा संकल्पही यावेळी कार्यकर्त्यांनी केला.
उत्सवाचे औचित्य साधून ग्रामस्थांसाठी मंडळाच्या वतीने ‘देऊळबंद' हा धार्मिक मराठी चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आला. हा चित्रपट पाहण्यासाठी गावातील अबालवृध्दानी गर्दी केली होती.
हे सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष संदीप घुगे, उपाध्यक्ष अतुल आंधळे यांच्यासह मंडळाचे सदस्य अमोल घुगे, नवनाथ इलग, किरण घुगे, शुभम घुगे, अशोक इलग, सागर इलग, संदीप इलग, संतोष आंधळे, मंगेश आंधळे, सुदर्शन मुळे, नवनाथ आंधळे, संजय आंधळे, किरण सोसे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान, सिध्दिविनायक मंडळाने पारंपारिक चौकटीबाहेर पडून राबवलेल्या या सर्व समाजोपयोगी उपक्रमांबद्दल प्रतापपूर ग्रामस्थांनी कौतुक करत मंडळाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.