नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय योजना व पीक विम्याचा लाभ देणार!

संगमनेर Live
0
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय योजना व पीक विम्याचा लाभ देणार!

◻️​ कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संगमनेर तालुक्यातील पिंपळे गावात सोयाबीन पिकाची बांधावर जाऊन केली पाहणी


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | दुष्काळसदृश परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी राज्य शासन पूर्ण ताकदीने पाठीशी उभे आहे. सर्व शासकीय योजना, पीक विमा आणि कर्जमुक्ती योजनांचा लाभ शेतकऱ्यांना प्राधान्याने मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथील शेतकरी सोपान चकोर यांच्या शेताच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन त्यांनी पावसाअभावी करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली आणि उपस्थित शेतकऱ्यांना धीर दिला.

​पाहणीदरम्यान पिंपळे गावातील शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या लाभाबाबत येणाऱ्या अडचणी कृषिमंत्र्यांसमोर मांडल्या. त्याची तत्काळ दखल घेत, चालू खरीप हंगामात कृषी आणि महसूल विभागाने संयुक्तपणे तात्काळ कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले. “मी स्वतः शेतकरी असून शेतकऱ्यांच्या वेदना मला ठाऊक आहेत. त्यामुळे प्रशासनाने केवळ कार्यालयात न बसता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन योजना पोहोचवाव्यात,” असेही त्यांनी ठामपणे बजावले.

​कठीण परिस्थितीत शेती, पशुपालन, चारा आणि पाणीटंचाई यावर तातडीने उपाययोजना करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे सांगताना कृषिमंत्री म्हणाले, “केंद्र शासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागामार्फत नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी मदत दिली जाईल. यासंदर्भातील सर्वसमावेशक अधिसूचना शासन स्तरावरून लवकरच निर्गमित करण्यात येत आहे.”

​पावसाच्या खंडामुळे पिकांना पाणी देण्यासाठी विजेची अत्यंत गरज आहे. मात्र, वीज पुरवठ्यात अडथळे येत असल्याने पिकांचे नुकसान वाढू नये, यासाठी महावितरणने रोहित्र (डीपी/ट्रान्सफॉर्मर) वेळेत उपलब्ध करून द्यावेत आणि सुरळीत वीजपुरवठा करावा, अशा सक्त सूचना त्यांनी महावितरण विभागाला दिल्या.

​दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा सविस्तर आढावा बैठकीत मांडला. जिल्ह्यात पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, ११३.०३ टक्के पेरणी झालेल्या सोयाबीनचे पीक सध्या शेंगा भरण्याच्या संवेदनशील अवस्थेत आहे; मात्र पाण्याच्या ताणामुळे शेंगा चपट्या राहून दाणे बारीक राहण्याची व पीक सुकण्याची भीती निर्माण झाली आहे. कपाशीची ९१.६६ टक्के पेरणी झाली असून पावसाअभावी वाढ खुंटल्याने पाते व फुलांची गळ होत आहे, तसेच काही भागांत रसशोषक कीड व गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. मक्याची १६३.३४ टक्के आणि तुरीची १३४.३२ टक्के पेरणी झाली असली तरी अपुऱ्या पावसामुळे मक्याची कणसे भरण्यात अडथळा येऊन वजनात मोठी घट होण्याची तर तुरीची वाढ खुंटण्याची शक्यता आहे. याशिवाय मुगाची ४७.८३ टक्के, उडदाची ६१.४५ टक्के तर बाजरीची ६३.८३ टक्के पेरणी झाली असून पावसाअभावी ही पिकेही पूर्णतः करपण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, या दौऱ्याप्रसंगी आमदार अमोल खताळ, कृषी आयुक्त सुरज मांढरे, जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, कृषी संचालक विनयकुमार आवटे, विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे, तालुका कृषी अधिकारी श्रीमती बोडखे यांच्यासह महसूल, ग्रामविकास व महावितरणचे अधिकारी आणि स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !