खेळातून आरोग्य जपा, संघभावनेतून प्रवरेला पुढे न्या - मंत्री विखे पाटील

संगमनेर Live
0
खेळातून आरोग्य जपा, संघभावनेतून प्रवरेला पुढे न्या - मंत्री विखे पाटील

◻️ ‘प्रवरा क्रीडा महोत्सव २०२६’ चा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न


संगमनेर LIVE (​अनिल शेळके) | “मैदानी खेळामुळे आरोग्य उत्तम राहण्यासोबतच विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुप्त कौशल्यांना नवी ऊर्जा व दिशा मिळते. शिक्षकांनी स्वतः मैदानात उतरून खेळल्यास विद्यार्थीही आपोआप मैदानाकडे आकर्षित होतील. खेळातून आरोग्य जपत संघभावनेच्या बळावर प्रत्येकाने प्रवरेचा नावलौकिक वाढवावा. या क्रीडा संस्कृतीतूनच भविष्यात प्रवरेचे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर नक्कीच भरारी घेतील," असा दृढ विश्‍वास राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

​प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित ‘प्रवरा क्रीडा महोत्सव २०२६’ च्या पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
​या महोत्सवाच्या मंचावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, उद्योजक गणेश निबे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, सौ. मंदाताई निबे, सौ. मंजुश्री निबे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे तसेच प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​आपल्या भाषणात नामदार विखे पाटील पुढे म्हणाले, “आज भारत संरक्षण क्षेत्रात वेगाने ‘आत्मनिर्भरते’कडे पाऊल टाकत आहे. या राष्ट्रीय कार्यात प्रवरेचे भूमिपुत्र आणि उद्योजक गणेश निबे यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. प्रवरेचा विद्यार्थी आज देशपातळीवर संरक्षण क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे, ही संपूर्ण संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे.”

​विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकेतर सेवकांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे कौतुक करताना त्यांनी नमूद केले की, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाबरोबरच संघभावना, शिस्त आणि मूल्यसंवर्धनाचे काम प्रभावीपणे सुरू असून संस्था रोजगारनिर्मितीतही अग्रेसर ठरत आहे.

​याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना उद्योजक गणेश निबे यांनी संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “प्रवरेच्या भूमीने मला ज्ञान आणि सन्मान दिला, तर नामदार विखे पाटील यांच्या निरंतर मार्गदर्शनामुळेच प्रवरेचा विद्यार्थी जागतिक स्तरावर झेप घेऊ शकला. या भागातील तरुणांना आणि नवउद्योजकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नामदार विखे पाटील यांनी घेतलेला संकल्प आम्ही पूर्ण ताकदीने पुढे नेऊ. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकू पाहणाऱ्या होतकरू खेळाडूंना आणि गुणवंत विद्यार्थ्यांना ‘निबे उद्योग समूहा'च्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.” अशी ग्वाही दिली.

​या क्रीडा महोत्सवादरम्यान व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट यांसह विविध मैदानी स्पर्धा अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडल्या. विजेत्या महाविद्यालयीन आणि सेवक संघांना मान्यवरांच्या हस्ते करंडक व प्रशस्तिपत्रके देऊन सन्मानित करण्यात आले. ​कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन संस्थेच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. उत्तमराव अनाप, डॉ. रमेश दळे आणि क्रीडा शिक्षकांच्या पथकाने केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !