सभासदासह दूध उत्पादकांची दिवाळी गोड करणार - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
सभासदासह दूध उत्पादकांची दिवाळी गोड करणार - बाळासाहेब थोरात

◻️ ​संगमनेर कारखान्याची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | “शेतकऱ्यांच्या कष्टावर उभ्या राहिलेल्या संस्था आणि निळवंडेच्या पाण्यामुळे तालुक्यात आलेली समृद्धी उध्वस्त करण्याचे षडयंत्र सुरू आहे. सध्याचे स्थानिक लोकप्रतिनिधी स्वतःच्या मर्जीने नव्हे, तर ‘रिमोट कंट्रोल’वर काम करत असून जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर मौन बाळगून आहेत. त्यामुळे आपल्या हक्काच्या पाण्यासाठी आणि पूर्ण दाबाने अखंड वीजपुरवठा मिळवण्यासाठी तालुक्यातील जनतेला पुन्हा एकदा संघर्षाचे रणशिंग फुंकावे लागेल,” असा इशारा काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला. 

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी यंदा साखर कारखाना व दूध संघाच्या माध्यमातून शेतकरी व सभासदांची दिवाळी गोड केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी केली. याच कार्यक्रमात कार्यक्षेत्रात सर्वाधिक एकरी उत्पादन घेणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

​आपल्या भाषणात कारखान्याच्या वाटचालीचा आढावा घेताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, अवघ्या ८०० मेट्रिक टनावरून सुरू झालेल्या या कारखान्याने ५९ वर्षांत इथेनॉल, डिस्टिलरी आणि सहवीज निर्मितीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. निळवंडेचे पाणी शिवारात पोहोचल्याने शेतकऱ्यांनी आता आधुनिक तंत्रज्ञान वापरून एकरी १०० टन ऊस उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवावे. कार्यक्षेत्रात ११ लाख टन ऊस गाळप झाल्यास कारखाना राज्यात उच्चांकी दर देईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

​तालुक्यातील नव्या नेतृत्वाचा समाचार घेताना ते पुढे म्हणाले की, आम्ही चाळीस वर्षांच्या निष्ठेतून संगमनेरला राज्यातील पहिल्या पाच प्रगत तालुक्यांत आणून बसवले. मात्र, काही जण निष्क्रीय मुलांसारखे ‘वडिलांनी काय केले?’ असा उफराटा सवाल विचारत आहेत. ज्यांनी आयुष्यात ऊसाचे एक टिपरू पिकवले नाही, ज्यांनी एक लिटर दूध उत्पादित केले नाही आणि जे कारखान्याचे सभासदही नाहीत, ते लोक आज सहकार मोडीत काढण्याची भाषा करत आहेत. सोशल मीडियावर बसून अफवा पसरवण्यापलीकडे त्यांचे कोणतेही कर्तृत्व नाही. जेथून ‘स्क्रिप्ट’ लिहून येते, त्या धन्यांवर ते कधीच बोलू शकत नाहीत; कारण तसे केले तर त्यांचे दाणापाणी बंद होईल. अशी बोचरी टीका केली.

​नाव न घेता स्थानिक आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्लाबोल करताना थोरात म्हणाले की, उठसूट पत्रकार परिषदा घेणारे लोकप्रतिनिधी वीज, पाणी आणि रेल्वे या मूळ प्रश्नांवर एक शब्दही बोलत नाहीत. त्यांची नजर केवळ वाळू आणि मुरुमावर खिळलेली आहे. आमच्या काळात ११ तास अखंड पूर्ण दाबाने वीज मिळत होती, आज मात्र विजेचा खेळखंडोबा करून शेतकऱ्यांचे पाणी रोखले जात आहे. अशा दडपशाहीविरोधात जनतेलाच आता रस्त्यावर उतरावे लागेल.

​अखेर साखर उद्योगाच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, साखर कारखानदारीच्या माध्यमातून दरवर्षी केंद्र व राज्य सरकारला तब्बल ८ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो. हा उद्योग ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. दर दहा वर्षांनी या उद्योगासमोर नैसर्गिक व बाजारपेठीय अडचणी उभ्या राहतात. त्यामुळे अशा संकटकाळात राज्य शासनाने हात न आखडता साखर कारखानदारीला ठोस आर्थिक मदत व पॅकेज जाहीर करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !