लोणी हे ‘वैद्यकीय पर्यटनाचे’ जागतिक केंद्र बनू शकते - पद्मविभूषण प्रा. शर्मा

संगमनेर Live
0
लोणी हे ‘वैद्यकीय पर्यटनाचे’ जागतिक केंद्र बनू शकते - पद्मविभूषण प्रा. शर्मा

◻️ ​प्रवरा अभिमत विद्यापीठाचा २३ वा वर्धापनदिन उत्साहात


संगमनेर LIVE (अनिल शेळके) | पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून लोणीसारख्या ग्रामीण भागात अत्याधुनिक आरोग्य शिक्षणापासून ते उच्च दर्जाच्या रुग्णसेवेपर्यंत सर्व सोयीसुविधांचे जाळे निर्माण होणे ही खरोखरच असामान्य बाब आहे. विखे पाटील कुटुंबाच्या प्रयत्नांमुळे एखाद्या परिसराचा कसा कायापालट होऊ शकतो, याचे लोणी हे मूर्तिमंत उदाहरण असून येथे ‘थिंक ग्लोबली, ॲक्ट लोकली’ या उक्तीची प्रत्यक्ष प्रचिती येते. भारत हे आंतरराष्ट्रीय पातळीवर वैद्यकीय पर्यटनाचे अत्यंत महत्त्वाचे केंद्र बनू शकते आणि त्यासाठी लोणी हे सर्वार्थाने आदर्श ठिकाण आहे, असे गौरवोद्गार ख्यातनाम शास्त्रज्ञ पद्मविभूषण प्रा. मनमोहन शर्मा यांनी केले.

​प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्सेस (अभिमत विद्यापीठ), लोणी (ता. राहाता) या संस्थेच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त तसेच ‘कॉलेज ऑफ फार्मास्युटीकल सायन्सेस'च्या नूतन इमारतीच्या उध्दघाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. शर्मा बोलत होते. याच समारंभात वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कराड येथील कृष्णा विश्‍व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांना प्रवरा अभिमत विद्यापीठाच्या वतीने कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या समारंभास कृष्णा महिला उद्योग समूहाच्या संस्थापिका उत्तरा भोसले, प्रवराच्या विश्‍वस्त सुवर्णाताई विखे पाटील, मोनिका सावंत, विश्‍वस्त ध्रुव विखे पाटील, कुलसचिव डॉ. रविंद्र लावरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात मार्गदर्शन करताना प्रा. मनमोहन शर्मा पुढे म्हणाले की, विद्यापीठांनी आता पारंपरिक चौकटीबाहेर पडून संशोधन आणि कौशल्य विकासावर अधिक भर दिला पाहिजे. वैद्यकीय महाविद्यालयांनी स्वतःची काही विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्रे विकसित करावीत, ज्यामुळे संस्थेची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण होईल. मध्य पूर्व देशांसह जगभरातील रुग्ण गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी आणि उपचारांसाठी येथे यावेत, अशी अद्ययावत क्षमता लोणीमध्ये विकसित होऊ शकते, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

​सत्काराला उत्तर देताना डॉ. सुरेश भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ग्रामीण भागात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून ते यशस्वीरीत्या चालवता येते, हा आदर्श डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी घालून दिला आणि त्यांच्याच प्रेरणेतून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खाजगी वैद्यकीय महाविद्यालये उभी राहिली, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. प्रवरा आणि कृष्णा या दोन्ही आरोग्य संस्थांचा प्रवास एकाच कालखंडात व एकाच ध्येयाने सुरू झाला असून दोन्ही संस्थांची कार्यपध्दती एकमेकांना पूरक आहे. विखे पाटलांच्या या पावन कर्मभूमीत जीवन गौरव पुरस्कार स्वीकारणे ही माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची आणि आनंदाची बाब असल्याचे डॉ. भोसले यांनी नमूद केले.

​संशोधनाच्या बदलत्या स्वरूपावर प्रकाश टाकताना मुंबईच्या इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू डॉ. अनिरुध्द पंडित यांनी स्पष्ट केले की, आता एकाकी संशोधन करण्याचा काळ संपला आहे. परस्पर सहकार्य आणि विविध विचारांच्या एकत्र येण्यातूनच संशोधनात मोठे यश मिळवणे शक्य आहे. या संशोधनाचा अंतिम लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक असून, त्यासाठी शैक्षणिक संस्था व विविध विभागांमध्ये सामंजस्य करार (एमओयू) करून संशोधनाला गती दिली पाहिजे.

​अध्यक्षीय भाषणात कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आलेख मांडला. गेल्या शैक्षणिक वर्षात संस्थेने मल्टी ऑर्गन ट्रान्सप्लांट सेंटरची यशस्वी स्थापना केली आहे, तसेच प्रवरा रुग्णालयाला एनएबीएच व एनएबीएल ही राष्ट्रीय मानांकने मिळाली आहेत. अत्याधुनिक व जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा ग्रामीण जनतेच्या दारात पोहोचविण्याचा आमचा संकल्प यातून अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.

​या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये ग्रामीण दंत महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. शिवानी सचदेवा यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, प्रा. शुभम कानवडे यांना बेस्ट रिसर्च पेपर पुरस्कार, श्रीमती सिंधूताई एकनाथराव विखे पाटील ‘स्टुडंट ऑफ द इयर’ पुरस्कार त्रिलोचना मुनोत व वृंदा पाटील यांना, तर डॉ. बाळासाहेब विखे पाटील ‘स्टुडंट ऑफ द इयर’ पुरस्कार सिद्धेश झिलपे यांना प्रदान करण्यात आला. 

तसेच अथर्व भटकर (बेस्ट एनएसएस), अनिकेत दिवे (ऑलराऊंड बेस्ट नर्सिंग स्टुडंट), अनुष्का कडू (सेकंड बेस्ट नर्सिंग स्टुडंट), कनिका जैन व शिवम वाघमारे (यंग बडी रिसर्चर) यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. फार्मसी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उत्कृष्ट उभारणीबद्दल स्वान इन्फ्राचे संचालक स्वप्नील सावंत तसेच संस्थेत २५ वर्षे अखंड सेवा पूर्ण केलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला.

दरम्यान, ​कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांनी केले, तर जीवन गौरव मानपत्राचे वाचन डॉ. संजीव कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. दीपिका भालेराव यांनी तर आभार कुलसचिव डॉ. रवींद्र लावरे यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !