पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याने बंद पाटपाणी लिफ्ट तातडीने सुरू कराव्यात
◻️ सौ. प्रभावती घोगरे यांचे कारखाना प्रशासनाला निवेदन
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | सध्या पावसाअभावी दुष्काळसदृश स्थिती निर्माण झालेली असताना शेतकरी पाण्यासाठी वणवण करत आहेत. पिकांना पाण्याची अत्यंत गरज असताना कारखान्याच्या अखत्यारीतील पाटपाणी उपसा (लिफ्ट) योजना बंद आहेत. त्यामुळे कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत प्रत्यक्ष पाणी पोहोचवावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेसच्या सरचिटणीस प्रभावती जनार्दन घोगरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रशासनाला निवेदन देखील दिले.
दिलेल्या निवेदनात प्रभावती घोगरे यांनी नमूद केले आहे की, राहाता तालुक्यासह प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पावसाने प्रदीर्घ ओढ दिल्याने शेतीसमोर अभूतपूर्व संकट उभे राहिले आहे. ऊसासह इतर खरीप पिके पाण्याअभावी सुकू लागली असून, शेतकऱ्यांची ही उभी पिके वाचवण्यासाठी तातडीने सिंचनाची सोय होणे गरजेचे आहे. अशा नाजूक व बिकट परिस्थितीत कारखाना कार्यक्षेत्रातील पाटपाणी लिफ्ट बंद असल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांची व्यथा मांडताना घोगरे म्हणाल्या, “पिके वाचवण्यासाठी कारखाना प्रशासनाने संवेदनशील भूमिका घेऊन बंद असलेल्या सर्व पाटपाणी लिफ्ट तातडीने सुरू कराव्यात.” तसेच त्वरित सकारात्मक पावले न उचलल्यास शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही प्रभावती घोगरे यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.