प्रवरेचे यंदा १२ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट - ना. राधाकृष्ण विखे पाटील

संगमनेर Live
0
प्रवरेचे यंदा १२ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट - ना. राधाकृष्ण विखे पाटील

◻️​ पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा संपन्न

संगमनेर LIVE (​अनिल शेळके) | “दुष्काळी परिस्थिती, घटलेले ऊस उत्पादन आणि पाणीटंचाई अशा प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे यंदाचा गळीत हंगाम साखर उद्योगासाठी नक्कीच आव्हानात्मक आहे. मात्र, संकटांवर मात करण्याची ‘प्रवरे’ची ऐतिहासिक परंपरा राहिली आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून यंदा कारखाना १२ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण करेल,” असा ठाम विश्‍वास जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

प्रवरानगर ​येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळ्यात ते बोलत होते. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.

​आपल्या भाषणात पाणीटंचाईवर भाष्य करताना नामदार विखे पाटील म्हणाले, “यंदाच्या दुष्काळाचा मोठा फटका ऊस उत्पादनाला बसण्याची शक्यता असून अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर व्यवस्थापन जलसंपदा विभागामार्फत केले जात आहे. पिण्याच्या पाण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, शेतीसाठीही योग्य नियोजन करून ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल अशी व्यवस्था केली जात आहे.” या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन व आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करून उपलब्ध पाण्याचा वापर करावा आणि एकरी उत्पादन वाढवावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच राज्य सरकारने कारखाने लवकर सुरू करण्याचा घेतलेला निर्णय आणि केंद्र-राज्याचे साखर धोरण यामुळे सहकारी कारखानदारीला मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

​कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी कामगारांच्या तत्परतेचे कौतुक करताना सांगितले की, कारखान्याने वेळेत सर्व तयारी पूर्ण केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात उच्चांकी गाळप आणि उच्चांकी साखर उतारा देणारा अग्रगण्य कारखाना म्हणून प्रवरा कारखान्याची परंपरा कायम राखण्यासाठी सूक्ष्म नियोजन आखण्यात आले आहे.

​अध्यक्षीय भाषणात अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी कारखाना पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले, तसेच दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन पुढील वर्षाच्या ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज अधोरेखित केली.

दरम्यान, प्रारंभी संचालक रंगनाथ उंबरकर, रामप्रसाद मगर, श्रीकांत खर्डे, दिलीप यादव यांच्या हस्ते सपत्नीक बॉयलरचे विधिवत पूजा करून बॉयलर अग्नीप्रदीपन आणि उसाच्या मोळीचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, कारखान्याचे व्हा. चेअरमन सोपानराव शिरसाठ, प्रवरा बॅकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, कार्यकारी संचालक महेश कोनापुरे यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि प्रवरा उद्योग समूहातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !