नेवासा पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ महिनाभरातील दुसरी मोठी कारवाई
◻️ वडूलेत गांजाची शेती उद्ध्वस्त; १७० किलो गांजासह झाडे जप्त
संगमनेर LIVE (नेवासा) | नेवासा तालुक्यातील वडूले शिवारात शेतामध्ये चक्क गांजाची लागवड करून त्याची छुप्या पध्दतीने विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नेवासा पोलिसांनी सोमवारी (दि. ३१) या शेतावर धडक छापा मारून ४० ते ५० गांजाची जिवंत झाडे आणि तब्बल १७० किलो वाळवलेला गांजा जप्त केला आहे. महिनाभरातील गांजा शेतीवरील ही दुसरी मोठी कारवाई असल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, वडूले शिवारात गांजाची शेती केली जात असून तो सुकवून त्याची तस्करी केली जात आहे. माहितीची खात्री केल्यानंतर दराडे यांनी तातडीने पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी पूर्ण तयारीनिशी वडूले शिवारातील शेतकरी बबन देशमुख यांच्या शेतावर छापा टाकला.
पोलिसांनी शेताची पाहणी केली असता, तिथे गांजाची ४० ते ५० जिवंत झाडे आढळून आली. तसेच, विक्रीसाठी सुकवून ठेवलेला सुमारे १७० किलो गांजा पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी पंचांसमक्ष या मुद्देमालाची नोंद करून तो ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी आरोपीवर गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनःप्रभावी पदार्थ अधिनियम (एनडीपीएस कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नेवासा पोलीस ठाण्यात सुरू आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या जिल्ह्यात ‘नशामुक्त अहिल्यानगर’ अभियान राबवले जात आहे. यांतर्गत अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी निरजकुमार राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलिसांनी ही कारवाई केली. पीआय प्रताप दराडे, डीबी प्रमुख पीएसआय विकास पाटील आणि त्यांच्या पथकाने अत्यंत गोपनीय पध्दतीने हे ऑपरेशन फत्ते केले. विशेष म्हणजे, महिनाभरापूर्वीच वाकडी शिवारातही गांजाच्या शेतीवर पोलिसांनी अशीच धडक कारवाई केली होती.
दरम्यान, ड्रग्स अथवा अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीबाबत किंवा लागवडीबाबत नागरिकांना कोणतीही माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने ‘डायल ११२’ किंवा नेवासा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केले आहे.
“नेवासा तालुक्यात वाढत्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांचे विशेष लक्ष आहे. पांढरीपुल येथील बनावट खत कारखाना, चांदा येथील बनावट दारू आणि आता वाकडी व वडूले येथील गांजा शेती उद्ध्वस्त करत पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले आहे. यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील.” अशी ग्वाही पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. अशी माहिती पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांनी कळवली आहे.