वीज उपकेंद्रासाठी महावितरणला महिनाभरात जागा उपलब्ध करून द्या!

संगमनेर Live
0
वीज उपकेंद्रासाठी महावितरणला महिनाभरात जागा उपलब्ध करून द्या!

◻️आमदार अमोल खताळ यांची नगरपरिषदेला सूचना


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर शहरातील विस्कळीत वीजपुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नवीन विद्युत उपकेंद्र उभारण्यासाठी महावितरण कंपनीला नगरपरिषद प्रशासनाने एका महिन्याच्या आत जागा उपलब्ध करून दिल्यास त्याठिकाणी नवीन वीजेचे उपकेंद्र उभारले जाऊ शकते. अशी सूचना आमदार खताळ यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

​शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तारामुळे विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. सध्या शहराच्या अनेक भागांत कमी दाबाने वीजपुरवठा होणे, तसेच वारंवार वीजपुरवठा खंडित होणे यांसारख्या तांत्रिक समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. वाढत्या वीज भारामुळे निर्माण होणाऱ्या या अडचणी सोडवण्यासाठी शहरात नवीन ३३/११ के.व्ही. क्षमतेचे विद्युत उपकेंद्र उभारणे अत्यंत आवश्यक बनले आहे.

नवीन उपकेंद्रासाठी महावितरणने कोल्हेवाडी रोड येथील जलकुंभाशेजारील नगरपरिषदेच्या मालकीच्या सुमारे ९.५ गुंठे जागेची मागणी केली होती. जनहित लक्षात घेऊन नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेने ठराव करत ही जागा रेडी रेकनर दरानुसार महावितरणला भाडेतत्त्वावर देण्यास मंजुरीही दिली होती.

​मात्र, प्रशासकीय पातळीवर याला ब्रेक लागला. सदर जागा रहिवासी भागातील ‘ओपन स्पेस' (खुली जागा) असल्याने तिची विक्री करता येत नाही, तसेच ती भाडेतत्त्वावर देण्याबाबतही काही तांत्रिक व प्रशासकीय अडचणी असल्याचे नगरपरिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. परिणामी, उपकेंद्राचा विषय प्रलंबित राहिला होता.

या प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी नुकतीच महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. “नगरपरिषदेकडून जागा उपलब्ध झाल्यास तातडीने ३३/११ के.व्ही. उपकेंद्राचे काम हाती घेतले जाईल आणि शहरातील वीज समस्या कायमची दूर होईल,” अशी ग्वाही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.

​यानंतर आमदार खताळ यांनी तात्काळ नगरपरिषद प्रशासनाला सूचना केल्या आहेत. सर्वसाधारण सभेने यापूर्वी घेतलेल्या ठरावाचा आदर करत आणि संगमनेरकरांचे हित सर्वोच्च स्थानी ठेवून, योग्य त्या अटी व शर्तींच्या अधीन राहून ही ९.५ गुंठे जागा महावितरणला भाडेतत्त्वावर द्यावी. यासाठी आवश्यक ती सर्व प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करून एका महिन्याच्या आत जागा महावितरणच्या ताब्यात द्यावी, असे आमदार खताळ यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ​आमदार खताळ यांच्या या जलद हालचालींमुळे प्रशासकीय लालफितीत अडकलेला उपकेंद्राचा प्रश्न लवकरच मार्गी लागून संगमनेरकरांची विजेच्या समस्येतून सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !