जवळे कडलग येथे बाळासाहेब थोरातांकडून पवार कुटुंबीयांचे सांत्वन

संगमनेर Live
0
जवळे कडलग येथे बाळासाहेब थोरातांकडून पवार कुटुंबीयांचे सांत्वन 

◻️ वाढत्या बिबट्याच्या हल्ल्यांवर कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी


​संगमनेर LIVE (अनिल शेळक) | संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून १२ वर्षीय कृष्णा वसंत पवार या शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज जवळे कडलग गाठून पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील बिबट्यांच्या वाढत्या दहशतीवर तीव्र चिंता व्यक्त करत, वनविभाग आणि प्रशासनाच्या उदासीन कारभारावर ताशेरे ओढले.

​कृष्णाच्या मृत्यूची दुःखद घटना समजताच बाळासाहेब थोरात यांनी समाजमाध्यमांवरून तत्काळ शोक व्यक्त केला होता. एवढेच नाही तर, आपल्या कार्यकर्त्यांना व यंत्रणेला तातडीने पवार कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. आपला जळगाव, धुळे, पुणे आणि नाशिक असा प्रदीर्घ दौरा आटोपल्यानंतर थोरात यांनी आज तातडीने जवळे कडलग येथील वसंत पवार यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबाला धीर दिला.

याप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, “राज्यासह आपल्या तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्यांचे हल्ले वाढत आहेत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. ग्रामीण भागात बहुतांश नागरिकांचे वास्तव्य हे वाड्या-वस्त्यांवर असते. शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री बाहेर पडावे लागते, तर विद्यार्थीही रोज शाळेत ये-जा करत असतात. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे सध्या नागरिक, महिला आणि विशेषतः विद्यार्थी प्रचंड दहशतीखाली आहेत.”

​“या गंभीर समस्येवर आपण शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. यावर कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजना होणे काळाची गरज आहे. वनविभाग व प्रशासनाने याबाबत अधिक सतर्कतेने काम केले पाहिजे, मात्र त्यांची सध्याची उदासीनता अतिशय संतापजनक आहे,” अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी शेतकऱ्यांनीही खबरदारी घेण्याचे आवाहन थोरात यांनी केले. “सर्व शेतकऱ्यांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपल्या शेततळ्यांच्या चारही बाजूंनी तातडीने संरक्षक जाळी (कम्पाऊंड) बांधून घ्यावी,” असे ते म्हणाले.

दरम्यान, ​या सांत्वन भेटीदरम्यान बाळासाहेब थोरात यांनी कृष्णाचे वडील वसंत पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच, घरातील इतर सदस्यांची अत्यंत आस्थेवाईकपणे चौकशी करत, या मोठ्या दुःखातून सावरण्यासाठी संपूर्ण कुटुंबाला भक्कम आधार दिला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !