प्रवरेच्या ‘सेंद्रिय किचन गार्डन’मधून विद्यार्थ्यांना कृषि शिक्षणाचे प्रत्यक्ष धडे!

संगमनेर Live
0
प्रवरेच्या ‘सेंद्रिय किचन गार्डन’मधून विद्यार्थ्यांना कृषि शिक्षणाचे प्रत्यक्ष धडे!

​◻️ सैनिकी स्कूलमधील शेवगा लागवड ठरतेय लक्षवेधी; भाजीपाला थेट ‘सिंधू छाया सेंट्रल किचन’मध्ये


संगमनेर LIVE (​लोणी) | आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पारंपरिक शिक्षण आणि पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून मिळणारे शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. नेमकी हीच गरज ओळखून, लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने आपल्या संकुलात ‘सेंद्रिय किचन गार्डन'चा अभिनव प्रयोग राबवला आहे. या उपक्रमामुळे शाळेचा परिसरच आता विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा बनला असून, हे ‘किचन गार्डन’ विद्यार्थ्यांच्या हातातील शेतीचे प्रत्यक्ष पाठ्यपुस्तक ठरत आहे.

​संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून प्रवरा शैक्षणिक संकुलात विद्यार्थी केंद्रित आणि कौशल्यावर आधारित शिक्षणाला विशेष प्राधान्य दिले जात आहे.

ग्रामीण भागात शेतीशी निगडित असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना शेतीची माहिती, उत्पादन तंत्रज्ञान आणि आधुनिक शेतीची ओळख व्हावी, या उद्देशाने शाळा व महाविद्यालयांच्या आवारात विविध प्रकारचा भाजीपाला, फळपिके आणि औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. प्रवरा कृषीशास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम यांच्या प्रयत्नातून, कृषी विषयाचे प्राध्यापक व विद्यार्थी शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करत आहेत. लागवडीपासून ते खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण आणि प्रत्यक्ष उत्पादन घेण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थी स्वतःच्या हाताने अनुभवत आहेत.

या उपक्रमाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, विद्यार्थ्यांना पौष्टिक व दर्जेदार आहार मिळण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘सिंधू छाया सेंट्रल किचन’ला या बागेतून ताजा आणि सेंद्रिय भाजीपाला उपलब्ध होत आहे. एका बाजूला विद्यार्थी शेतीचे प्रत्यक्ष धडे गिरवत आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्याच श्रमातून पिकलेला दर्जेदार भाजीपाला त्यांच्याच आहाराचा भाग बनत आहे. 'शिक्षणातून कौशल्य आणि कौशल्यातून स्वावलंबन' या विचाराला हा उपक्रम खऱ्या अर्थाने दिशा देत आहे.

दरम्यान, आजकाल अनेक तरुण शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याऐवजी त्यापासून दूर जाताना दिसतात. अशा परिस्थितीत प्रवरेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच श्रमसंस्कृतीची आवड निर्माण होत आहे. प्रवरा कन्या विद्या मंदिर, प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल, प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल, प्रवरा पब्लिक स्कूल आणि सैनिकी स्कूलसारख्या निवासी शाळांच्या परिसरात या बागा बहरल्या आहेत. सुट्टीच्या दिवशी वसतिगृहातील विद्यार्थी निसर्गरम्य वातावरणात वेळ घालवत असून, त्यांचे निसर्गाशी नाते अधिक घट्ट होत आहे.

सैनिकी स्कूलमधील शेवगा लागवड ठरतेय लक्षवेधी!

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी स्कूलच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सहभागातून केलेली शेवग्याची लागवड सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या शेवग्याच्या झाडांची लागवड करणे, त्यांचे संगोपन करणे आणि त्यांची वाढ पाहणे, याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थी घेत आहेत. या विशिष्ट उपक्रमातून विद्यार्थ्यांना निसर्ग, पर्यावरण, मानवी आरोग्य आणि शेती यांच्यातील परस्परसंबंध समजण्यास मोठी मदत होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !