साकुरी शिवारात बिबट्याचा शेळीवर जीवघेणा हल्ला

संगमनेर Live
0
साकुरी शिवारात बिबट्याचा शेळीवर जीवघेणा हल्ला

​◻️ आरडाओरड केल्याने बिबट्याचे पलायन; नागरिकांमध्ये दहशत 


संगमनेर LIVE (राहाता) | राहाता तालुक्यातील साकुरी शिवारात मध्यरात्री बिबट्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात एक शेळी अतिगंभीर जखमी झाली आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे शेळीचा जीव वाचला असला तरी, तिची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली असून, बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.

राहाता बाजारतळावरील वीरभद्र महाराज मंदिराच्या मागील बाजूस साकुरी शिवारातील कातनाला येथे बनसोडे वस्ती आहे. गुरुवारी पहाटे १:३० वाजेच्या सुमारास शिकारीच्या शोधात असलेल्या एका बिबट्याने अंधाराचा फायदा घेत बनसोडे वस्तीकडे मोर्चा वळवला. कलावंती रोहिदास बनसोडे यांच्या घराशेजारील शेडमध्ये बांधलेल्या शेळीवर बिबट्याने अचानक झडप घातली आणि तिला उचलून नेण्याचा प्रयत्न केला.

​मात्र, शेळीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून कलावंती बनसोडे यांनी तात्काळ बाहेर धाव घेत आरडाओरडा केला. त्यामुळे शेजारील नागरिक देखील जागे झाल्यामुळे उडालेल्या गोंधळाने बिबट्या बिथरला आणि त्याने काही अंतरावरच शेळीला सोडून अंधारात धूम ठोकली.

या हल्ल्यात बिबट्याचे दात शेळीच्या गळ्यात खोलवर घुसल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. सकाळी तिच्यावर प्राथमिक पशुवैद्यकीय उपचार करण्यात आले असले तरी, अतिरक्तस्राव आणि गंभीर दुखापतीमुळे तिची जगण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, घटनास्थळी आणि आजूबाजूला मोठी लोकवस्ती आणि पशुधन आहे. तसेच लगत बाजरतळ आणि मंदीर असल्याने रात्री-अपरात्री या भागात मोठी वर्दळ असते. त्यामुळे मानवी जीवितालाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो. वनविभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी कलावंती बनसोडे, सुधीर बनसोडे, सचिन बनसोडे, चंद्रकांत बनसोडे, साहेबराव बनसोडे, राजू सदाफळ, कैलास गायकवाड, शशिकांत राजगुरू, मच्छिंद्र बनकर, संदीप बनसोडे, किरण बनसोडे, अशोक बनसोडे, भाऊसाहेब बनसोडे, ताराबाई बनसोडे, वैशाली बनसोडे, संगीता बनसोडे यांच्यासह परिसरातील स्थानिक नागरिकांनी केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !