महायुतीच्या जलनीतीने अहिल्यानगरचा दुष्काळमुक्तीचा संकल्प प्रत्यक्षात!
◻️ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून सिंचन विकासाचा समतोल
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | वर्षानुवर्षे तीव्र दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी महायुती सरकारने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील रखडलेल्या आणि महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पांना भरीव निधीसह आवश्यक प्रशासकीय मान्यता मिळाल्या आहेत. केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्षात निधी उपलब्ध झाल्यामुळे ‘दुष्काळी जिल्हा’ ही ओळख पुसून ‘सिंचनसमृध्द अहिल्यानगर’ घडवण्याच्या दिशेने निर्णायक पावले पडत असून, उत्तर आणि दक्षिण जिल्ह्याचा सिंचन समतोल साधला जात आहे.
या सिंचन क्रांतीत कुकडी प्रकल्पासाठी महायुती सरकारने ५,७०४ कोटी रुपयांची ऐतिहासिक मंजुरी दिली आहे. येडगाव, माणिकडोह, वडज, डिंभे आणि पिंपळगाव जोगे या पाच धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता ३०.५२ टीएमसी इतकी असून मंजूर रकमेपैकी ४,९४६.२० कोटी रुपये प्रत्यक्ष कामांसाठी, तर ७५८.३० कोटी रुपये अनुषंगिक खर्चासाठी वापरण्यात येणार आहेत. या प्रकल्पातील सुमारे १६ किलोमीटर लांबीचा डिंभे-माणिकडोह बोगदा हा पाण्याचा तुटवडा भरून काढणारा मुख्य दुवा ठरणार आहे. या कामांमुळे अहिल्यानगरसह पुणे आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांतील तब्बल १ लाख ४४ हजार ९१२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असून, वर्षानुवर्षे चाललेला प्रादेशिक पाणीसंघर्ष संपुष्टात येण्यास मोठी मदत होणार आहे.
दुसऱ्या बाजूला, गेली तीन दशके राजकीय आश्वासनांच्या फेऱ्यात अडकलेल्या दक्षिण अहिल्यानगरमधील साकळाई उपसा सिंचन योजनेला १,२३४ कोटी १३ लाख रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांशी बांधील राहत केलेल्या निरंतर पाठपुराव्यामुळे ही योजना प्रत्यक्ष मार्गी लागली आहे. यामुळे अहिल्यानगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील ३२ दुष्काळी गावांमधील सुमारे १० हजार हेक्टर कोरडवाहू शेतीला बारमाही पाण्याचा आधार मिळणार असून, या भागातील शेतकऱ्यांचे बहुप्रतीक्षित स्वप्न साकार होत आहे.
उत्तर अहिल्यानगरची जीवनदायिनी असलेल्या उर्ध्व प्रवरा अर्थात निळवंडे प्रकल्पातील कालव्यांची कामे गतीने पूर्णत्वास नेऊन दुष्काळी भागाला पाणी मिळवून देण्यात मोठे यश मिळाले आहे. धरणाचे काम पूर्ण होऊनही रखडलेल्या कालव्यांमधून आता पाण्याची आवर्तने सुरू झाली आहेत. या प्रकल्पाची सुधारित किंमत ५,१७७.३५ कोटी रुपये झाली असून, केंद्रीय जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीने ५,०२३ कोटी रुपयांच्या उर्वरित निधीस मान्यता दिल्याने कालव्यांचे जाळे पूर्ण क्षमतेने विस्तारत आहे.
याशिवाय गोदावरी, प्रवरा, मुळा आणि कुकडी या प्रकल्पांचे अस्तित्वात असलेले ब्रिटिशकालीन व जुने कालवे गळतीमुक्त करून त्यांची वहनक्षमता वाढवण्यासाठी ‘महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमा’अंतर्गत ९९८ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात एकट्या गोदावरी कालव्यांसाठीची तरतूद ४०० कोटी रुपयांपर्यंत नेण्यात आली असून, मुळा धरणाच्या उच्चस्तरीय उजव्या कालव्यावरील वांबोरी चारी टप्पा-१ च्या कामासाठी १४ कोटी ६० लाखांची मान्यता मिळाल्याने आणखी ३,५६८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
तसेच संगमनेर तालुक्यातील भोजापूर प्रकल्पाच्या पूरचारीचा समावेश थेट दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात करून परिसरातील ३५ पाझर तलाव भरण्याचा मार्ग सुकर करण्यात आला आहे. या सर्व प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पावसाच्या लहरीपणावरील परावलंबिता संपुष्टात येणार आहे.
शेताच्या बांधापर्यंत मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने रब्बी आणि उन्हाळी पिकांना हक्काचा आधार मिळेल; तर फळबागा, भाजीपाला उत्पादन, दुग्धव्यवसाय आणि कृषी प्रक्रिया उद्योगांना मोठी उभारी मिळून ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. कुकडी, साकळाई, निळवंडे आणि कालव्यांचे हे व्यापक जाळे दुष्काळमुक्तीची भक्कम हमी देत अहिल्यानगरच्या समृद्ध भविष्याची नवी पहाट ठरत आहे.