हक्काचे पाणी आणि पूर्ण दाबाने वीज न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडू!
◻️काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा इशारा
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | सध्या राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतातील उभी पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. पिकांना पाण्याची नितांत गरज असताना संगमनेर तालुक्यात विजेचा प्रचंड खेळखंडोबा सुरू आहे. कालव्यांच्या आवर्तन काळात सलग ११ तास वीज सुरू ठेवण्याचे न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असतानाही जाणीवपूर्वक वीजपुरवठा खंडित केला जात आहे. “वीज घालवायची आणि तालुक्याचे पाणी पुढे पळवायचे,” असा हा प्रकार असून तालुक्यातील जनतेच्या हक्काचे पाणी आणि पूर्ण दाबाने सुरळीत वीज मिळालीच पाहिजे; अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा काॅग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिला.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सभागृहात आयोजित संगमनेर शेतकी संघाच्या ६७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी शेतकी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, पांडुरंग घुले, मॅनेजर अनिल थोरात, कार्यालयीन अधीक्षक बी. एन. काळे यांच्यासह संचालक व शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यातील बिकट परिस्थितीवर बोट ठेवताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “१९८९ मध्ये भंडारदरा धरणातून तालुक्यासाठी ३० टक्के हक्काचे पाणी आपण संघर्ष करून मिळवले. त्यानंतर आवर्तन काळात शेतकऱ्यांसाठी ११ तास वीज मिळावी, यासाठी न्यायालयीन लढा देऊन हक्क मिळवला. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून शेतीसाठी लागणारे पाणी आणि विजेबाबत शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय सुरू आहे. सध्या सायंकाळी ६ ते ९ या वेळेत अघोषित लोडशेडिंग केले जात असून गेल्या तीन-चार दिवसांपासून संपूर्ण वीज व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या अनागोंदीवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही.”
“निळवंडे धरण आणि दोन्ही कालव्यांची कामे अनेक संकटांवर मात करत आपण पूर्ण केली. संगमनेर शहरासाठी धरणातून थेट जलवाहिनीची योजना मार्गी लावली. आता मात्र दोन्ही कालव्यांचे अस्तरीकरण (लायनिंग) करून तालुक्याचे पाणी पुढे नेण्याचा डाव आखला जात आहे. दुष्काळात पिके होरपळत असताना हक्काचे पाणी अडवणे सहन केले जाणार नाही. यासाठी शेतकरी आणि जनतेने जागरूक राहून संघटित होण्याची गरज आहे,” असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.
खतांच्या उपलब्धतेबाबत केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल करताना थोरात म्हणाले, “आपण कृषिमंत्री असताना युरियाची गोणी ३५० रुपयांना मिळत होती, आज तिचे दर गगनाला भिडले आहेत. ‘बफर स्टॉक’च्या नावाखाली युरिया गोदामांमध्ये अडवून ठेवला जात असून शेतकऱ्यांवर इतर महागडी खते बळजबरीने लिंकिंग करून लादली जात आहेत. युरियाचा बफर स्टॉक हा सरकारच्या अखत्यारीत असतो आणि त्यावर कृषी अधिकाऱ्यांचे नियंत्रण असते; मात्र बदनामी शेतकी संघाची केली जाते. सत्ताधाऱ्यांचे पाणी, वीज आणि खते या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष नसून त्यांची नजर केवळ वाळू आणि मुरुमावरच खिळली आहे,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
सहकार चळवळीचा गौरव करताना ते म्हणाले की, “यशवंतराव चव्हाण यांच्या कृषी-औद्योगिक क्रांतीच्या विचारांतून बाजार समित्या व शेतकी संघांची निर्मिती झाली. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी काटकसरीच्या पायावर स्थापन केलेला हा शेतकी संघ अमृत उद्योग समूहाची मातृसंस्था आहे. राज्यातील अनेक संस्था अडचणीत असताना संगमनेर शेतकी संघ मात्र पारदर्शक कारभारामुळे आजही सक्षमपणे उभा आहे.”
दरम्यान, शेतकी संघाच्या पेट्रोल पंपावरील ग्राहकांच्या विश्वासाबद्दल देखील त्यांनी समाधान व्यक्त केले.