जीवनातील प्रत्येक कार्यात निष्ठा व प्रामाणिकपणा जपा - डॉ. सुस्मिता विखे पाटील
◻️ प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचा डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
संगमनेर LIVE (अनिल शेळके)| प्रवरा सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या समृध्द संस्कृतीचा जागर होत असतानाच, क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना, एकोपा आणि परस्पर समन्वयाची जडणघडण व्हावी, हाच या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेत प्रत्येकाने जिंकण्यासाठीच खेळावे; मात्र त्यासोबतच जीवनातील प्रत्येक टप्प्यावर काम करताना निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पणाची भावना कायम ठेवावी, असे प्रतिपादन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी केले.
जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आणि डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ‘प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवा’तील विविध क्रीडा स्पर्धांच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या.
प्रवरा संस्थेच्या फार्मसी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर संस्थेतील शाळा, महाविद्यालये तसेच कर्मचाऱ्यांसाठी मुला-मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उध्दघाटन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी खेळाडूंना व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना, “खेळात संघभावना सर्वोच्च मानून विजय मिळवण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न करावेत,” असा संदेश त्यांनी दिला.
प्रवरा महोत्सवात विद्यार्थ्यांच्या सुप्त सांस्कृतिक गुणांना वाव देण्यासोबतच मैदानी खेळांनाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. संस्थेतील खेळाडूंच्या कौशल्याला योग्य दिशा व हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे, तर शिस्त, सहकार्य, सामाजिक बांधिलकी आणि निर्णयक्षमता यांसारखे महत्त्वाचे गुण विकसित होतात, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, या उध्दघाटन समारंभास शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे, डॉ. महेश खर्डे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र जाधव, आयटीआयचे अर्जुन आहेर, आस्थापना विभागाचे सागर शेगांवकर यांच्यासह संस्थेच्या विविध शाखांचे प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.