टंचाई आढावा बैठक हा गंमत करण्याचा विषय वाटला का? - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
टंचाई आढावा बैठक हा गंमत करण्याचा विषय वाटला का? - आमदार अमोल खताळ

◻️ गैरहजर अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | तालुक्यात दुष्काळ आणि पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर असताना, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आयोजित टंचाई आढावा बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या दांडीबहाद्दर अधिकारी व कर्मचाऱ्यांची आमदार अमोल खताळ यांनी चांगलीच खरडपट्टी काढली. “तुम्हाला टंचाई आढावा बैठक हा गंमत करण्याचा विषय वाटला का” असा संतप्त सवाल करत, गैरहजर राहिलेल्या सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे सक्त आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

​नवीन नगर रोडवरील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात आमदार अमोल खताळ यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर तालुका टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांच्यासह महावितरण, कृषी, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

​बैठकीत बोलताना आमदार खताळ म्हणाले की, “टंचाईच्या काळात विविध विभागांनी जबाबदारी एकमेकांवर न ढकलता समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. केवळ कार्यालयात बसून कागदी नियोजन चालणार नाही. ज्या गावात ज्या कर्मचाऱ्याची नियुक्ती आहे, त्याला तिथल्या भीषण वास्तवाची जाणीव असावीच लागेल.”

ग्रामसेवक गावात उपलब्ध नसल्याने नागरिकांना पाणी व टॅकरसाठी लोकप्रतिनिधींकडे चकरा माराव्या लागत असतील, तर असा निष्काळजीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी भरला. ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावागावात, वाड्या-वस्त्यांवर जाऊन पाहणी करावी आणि तातडीने टॅकर सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

​तालुक्यात जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, या बैठकीला पशुसंवर्धन विभागाचा एकही जबाबदार अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नव्हता. या बेजबाबदारपणावर आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

​दरम्यान, सावरगावतळे येथे अज्ञात आजारामुळे तीन गायींचा मृत्यू होऊनही पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी फिरकले नाहीत, तसेच काही डॉक्टरांकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी केली जात असल्याच्या गंभीर तक्रारी शेतकऱ्यांनी बैठकीत मांडल्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत आमदार खताळ यांनी संबंधित प्रकारावर तात्काळ चौकशी करून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले, तसेच जनावरांसाठी चारा, पाणी व आरोग्य सेवा २४ तास सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !