दुष्काळात लग्न सोहळे साधे साजरे करा - नामदार राधाकृष्ण विखे पाटील

संगमनेर Live
0
दुष्काळात लग्न सोहळे साधे साजरे करा - नामदार राधाकृष्ण विखे पाटील

◻️चारा छावण्यांऐवजी शेतकऱ्यांना थेट ‘डीबीटी’ने मदत

​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती पाहता नागरिकांनी अनावश्यक खर्च टाळून विवाह सोहळे अत्यंत साध्या पध्दतीने साजरे करावेत, असे आवाहन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. त्याचप्रमाणे, जनावरांच्या चाऱ्यासाठी गैरव्यवहाराची पार्श्वभूमी असलेल्या जुन्या चारा छावण्यांऐवजी शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात थेट 'डीबीटी'द्वारे अनुदान वर्ग करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. 

यासंदर्भात लवकरच मंत्रिमंडळ उपसमिती आणि मुख्यमंत्र्यांकडे मार्गदर्शक नियमावली तयार करण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी लोणी येथे माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले. यावेळी त्यांनी दुष्काळ निवारण, पाणी नियोजन, भारनियमनाची समस्या आणि विरोधकांच्या राजकीय भूमिकेवर सविस्तर भाष्य केले.

​पाणीटंचाई आणि दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने सामाजिक स्तरावर काटकसर बाळगणे गरजेचे असल्याचे सांगत नामदार विखे पाटील म्हणाले की, विवाह सोहळ्यांवरील अनाठायी खर्चावर नियंत्रण आणणे ही काळाची गरज आहे. स्वतःच्या मुलाचा विवाहदेखील अशाच पध्दतीने सामुदायिक विवाह सोहळ्यात अत्यंत साधेपणाने लावून दिल्याची आठवण त्यांनी करून दिली. दुष्काळात जनतेने सामंजस्य दाखवून विवाह साधेपणाने करावेत, यासाठी शासनाने विशिष्ट नियमावली जाहीर करावी, अशी सूचना आपण आगामी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मांडणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

​चारा छावण्यांच्या पध्दतीवर आक्षेप नोंदवत विखे पाटील यांनी आधुनिक पारदर्शक यंत्रणेचा पुरस्कार केला. चारा छावण्यांचा भूतकाळातील अनुभव फारसा चांगला राहिलेला नाही; अनेक गैरप्रकारांमुळे यापूर्वी विधिमंडळाची अधिवेशनेही गाजली आहेत. मात्र, आता परिस्थिती बदलली असून प्रशासनाकडे पशुधनाची डिजिटल जनगणना तसेच ‘लम्पी’ आजाराच्या काळातील लसीकरणाचा अचूक डेटा उपलब्ध आहे. या अद्ययावत माहितीचा आधार घेऊन शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात थेट अनुदान जमा केल्यास गैरप्रकारांना आळा बसेल आणि गरजूंना थेट लाभ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात पुढील तीन महिने पुरेल इतका चारा सध्या उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली.

​पाणी आणि विजेच्या समस्येबाबत बोलताना ते म्हणाले की, धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन पुढील पावसाळ्यापर्यंत अत्यंत काटेकोरपणे करावे लागणार आहे. यामध्ये पिण्याच्या पाण्यास सर्वोच्च प्राधान्य राहील आणि त्यानंतरच उर्वरित पाणी शेतीसाठी टप्प्याटप्प्याने दिले जाईल. याच दरम्यान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विखे पाटील यांनी लोणी येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हीसी) सहभाग घेतला. ग्रामीण भागातील वाढत्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे शासनाने या वीजटंचाईवर तातडीने आणि गांभीर्याने ठोस निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी महसूल मंत्र्यांकडे केली.

​दुष्काळी उपाययोजनांसोबतच विरोधकांच्या राजकीय भूमिकेवरही त्यांनी जोरदार प्रहार केला. काॅग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून सध्या केवळ ‘झूठ की गूंज' सुरू असून निवडणूक आयोगाच्या विरोधात सीजेपीच्या आंदोलनातून राजकीय फायदा लाटण्याचा त्यांचा प्रयत्न देशातील जनता हाणून पाडेल, असा टोला त्यांनी लगावला. एसआयआर प्रकरणाला जाणीवपूर्वक राजकीय वळण देण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी देशातील जनतेचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर अढळ असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. 

त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, मराठवाड्यात जाऊन शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करणाऱ्या ठाकरेंना मुख्यमंत्री झाल्यावर आपल्या आश्वासनाचा सोयीस्कर विसर पडला. सत्ताकाळात त्यांनी शेतकऱ्यांना एक रुपयाचीही मदत दिली नाही, याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे, अशा शब्दांत विखे पाटील यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !