लोणी खुर्द येथील कृत्रिम तलावात हजारो गणेशमूर्तींचे विसर्जन
◻️ ग्रामपंचायतीचा पर्यावरण व पाणी प्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | गणेशोत्सवातील धार्मिक पावित्र्य जपत पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी लोणी खुर्द (ता. राहाता) ग्रामपंचायतीने उचललेले पाऊल आदर्शवत ठरले आहे. गावात उभारण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन तलावात सुमारे ६ ते ७ हजार लहान-मोठ्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तींचे भावपूर्ण व शिस्तबध्द वातावरणात विसर्जन करण्यात आले. भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर मेळ घालणाऱ्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
दरवर्षी पिण्याच्या पाण्याच्या मुख्य पाटात गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात असल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. पिण्याच्या पाण्याचे रक्षण व्हावे या सामाजिक जाणिवेतून जनार्दन घोगरे यांनी ग्रामविकास अधिकारी महेश काळे यांच्याकडे कृत्रिम तलावाची संकल्पना मांडली. जनहित आणि पर्यावरण रक्षणाचा विचार करून महेश काळे यांनी तात्काळ सकारात्मक पाऊल उचलले आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने लोणी खुर्द येथे सुसज्ज कृत्रिम तलावाची उभारणी केली.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार हे ओळखून ग्रामविकास अधिकारी महेश काळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह प्रत्यक्ष विसर्जन स्थळावर तळ ठोकला. विसर्जन प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित व नियोजनबध्द रीतीने पार पडावी यासाठी त्यांनी दिवसभर अथक परिश्रम घेतले. प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे हजारो गणेशमूर्तींचे विसर्जन कोणत्याही अडचणीविना अत्यंत शांततेत पार पडले.
पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण रोखून सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारी पार पाडणाऱ्या या उपक्रमाला लोणी खुर्दसह परिसरातील गणेशभक्तांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. नागरिकांनी स्वतःहून कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जित करून या मोहिमेत सहभाग नोंदवला.
दरम्यान, या यशस्वी आणि पर्यावरणपूरक उपक्रमाबद्दल लोणी खुर्द ग्रामपंचायत, ग्रामविकास अधिकारी महेश काळे, सर्व कर्मचारी आणि संकल्पक जनार्दन घोगरे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.