​लोणीत आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडा अकादमी उभारणार - मंत्री विखे पाटील

संगमनेर Live
0
​लोणीत आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडा अकादमी उभारणार - मंत्री विखे पाटील

◻️जिल्ह्यातील ७३८ गुणवंत क्रीडारत्नांचा पालकांसह गौरव

संगमनेर LIVE (​अनिल शेळके) | अहिल्यानगर जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा व दर्जेदार प्रशिक्षण मिळावे, यासाठी लोणी येथे सर्वसोयींयुक्त भव्य क्रीडा अकादमी उभारण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. या अकादमीच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राचा विकास करताना पुरस्कारप्राप्त खेळाडूंना सल्लागार म्हणून सामावून घेतले जाईल आणि त्यांच्या अनुभवातूनच क्रीडा विकासाचा नवा अध्याय सुरू केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

​प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने पद्मश्री डॉ. विखे पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित भव्य सोहळ्यात राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविलेल्या जिल्ह्यातील तब्बल ७३८ खेळाडू आणि त्यांच्या पालकांना ‘क्रीडारत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये संस्थेच्या १७५ खेळाडूंचा समावेश असल्याने हा सोहळा विशेष अभिमानास्पद ठरला.

​सत्काराला उत्तर देताना नामदार विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्याच्या भूमिपुत्रांनी क्रीडा क्षेत्रात मिळवलेले यश हे केवळ अफाट जिद्द आणि कठोर मेहनतीचे फळ आहे. या यशामध्ये खेळाडूंच्या पालकांचे आणि मार्गदर्शकांचे मोलाचे योगदान असून, यामुळे जिल्ह्याची ओळख राज्य आणि देशपातळीवर उंचावली आहे. ज्या भूमीने सहकार, धवलक्रांती आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा पाया घातला, ती प्रवरेची भूमी आता खेळाडूंना उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी नवी दिशा देण्यास कटिबध्द आहे.

​या ऐतिहासिक सन्मानाबद्दल पुरस्कारप्राप्त खेळाडूंनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. आंतरराष्ट्रीय खेळाडू फिजा सय्यद हिने प्रवरा शिक्षण संस्थेच्या पाठबळामुळेच आदिवासी भागातील मुलगी भारताचे प्रतिनिधित्व करू शकल्याचे सांगत पुरस्कारामुळे नवी ऊर्जा मिळाल्याचे नमूद केले. तर आंतरराष्ट्रीय बुध्दिबळपटू ग्रॅडमास्टर शार्दुल गागरे याने नामदार विखे पाटील यांनी लहानपणापासून केलेल्या भक्कम सहकार्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर मजल मारता आल्याची कृतज्ञता व्यक्त केली. हा सोहळा पालकमंत्री सदैव खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची प्रचिती देणारा असल्याचे मत खेळाडू कोमल वाकळे हिने मांडले.

दरम्यान, ​या प्रेरणादायी सोहळ्यास युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, संचालक आप्पासाहेब दिघे, गणपत शिंदे, भारत घोगरे, पोपट वाणी, अशोक गागरे, डॉ. प्रफुल्ल सोमण तसेच पुरस्कारप्राप्त खेळाडू गणेश पवार यांच्यासह जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी, पालक आणि प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !