​राजकीय टीका खुशाल करा, मात्र कौटुंबिक चिखलफेक नको!

संगमनेर Live
0
​राजकीय टीका खुशाल करा, मात्र कौटुंबिक चिखलफेक नको!

◻️ डॉ. विखे पाटलांचे रोहीत पवारांना राजकारणात ‘लक्ष्मणरेषा’ पाळण्याचा इशारा

संगमनेर LIVE (​शिर्डी) | “राजकारणात धोरणांवर आणि कार्यपध्दतीवर जरूर टीका करा; मात्र राजकारणाचा स्तर इतका खाली आणू नका की घरात डोकावून कौटुंबिक चिखलफेक करावी लागेल. जर मी तुमच्या कौटुंबिक विषयांवर बोलायला लागलो, तर त्यावर राज्यात केवढी मोठी चर्चा उभी राहू शकते याचा विचार करा,” अशा शब्दांत डॉ. सुजय विखे पाटील यांनी आमदार रोहित पवार यांना माध्यमांशी संवाद साधताना इशारा दिला.

​रोहित पवार यांनी माध्यमांमध्ये केलेल्या वक्तव्यांचा समाचार घेताना विखे पाटील म्हणाले, “रोहित पवार हे एका सुसंस्कृत आणि प्रतिष्ठित कुटुंबातून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. कौटुंबिक वाद किंवा व्यक्तिगत विषय चव्हाट्यावर आणण्याचे काम ना पवार कुटुंबाने कधी केले, ना विखे पाटील कुटुंबाने. आमचा परिवार मर्यादित आहे, पण आम्ही कायम सभ्यता आणि सुसंस्कृतपणा जपला आहे. त्यामुळे समोरच्यांनीही त्याचे भान ठेवावे, हीच आमची माफक अपेक्षा आहे.”

​त्यांनी पुढे नमूद केले की, “तुम्ही आमच्या राजकीय भूमिकेवर, आमच्या कार्यपतीवर अथवा सरकारच्या कामकाजावर हवी तितकी सडकून टीका करा; मात्र घरातील कौटुंबिक वादात पडण्याची चूक करू नका.”

​विरोधकांकडून सातत्याने उपस्थित केल्या जाणाऱ्या पक्षांतराच्या टीकेलाही विखे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “आम्ही पक्षांतर केले किंवा कोणतीही राजकीय भूमिका घेतली, तरी जनतेचा आमच्यावर अढळ विश्‍वास आहे. मागील पाचही विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या पहिल्या पाच नेत्यांमध्ये मतदारांनी मला स्थान दिले आहे. त्यामुळे कोणाच्या अशा बोलण्याने आम्ही लहान किंवा मोठे होत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

​आपले संपूर्ण लक्ष जनसामान्यांच्या हितावर असून, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ​महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची आठवण करून देताना विखे पाटील म्हणाले, “राज्याची सुसंस्कृत परंपरा टिकवून ठेवण्याची जबाबदारी केवळ सत्ताधाऱ्यांची नाही, तर विरोधकांसह प्रत्येक लोकप्रतिनिधीची आहे. राजकीय संघर्षात कोणतीही मर्यादा किंवा लक्ष्मणरेषाच उरली नाही, तर त्यातून अत्यंत गलिच्छ राजकारण निर्माण होईल. असे खालच्या पातळीवरचे राजकारण महाराष्ट्राच्या वैचारिक आणि पुरोगामी परंपरेला मुळीच शोभणारे नाही.” असे देखील नमूद केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !