कौटुंबिक वादाचे राजकारण करणे जिल्ह्यासाठी घातक - डॉ. सुजय विखे पाटील
◻️ खासदाराना ‘स्वीडन’ कुठे आहे माहिती आहे का?
संगमनेर LIVE (शिर्डी) | “जिल्ह्याच्या विकासावर आणि जनतेच्या मूळ प्रश्नांवर बोलण्यासारखे काही उरले नसल्याने, राजकीय स्वार्थापोटी इतरांच्या कौटुंबिक वादात पडून चिखलफेक करणे ही विचारसरणी जिल्ह्यासाठी अत्यंत घातक आहे,” असा घणाघाती आरोप माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे. संबंधित खासदारांना ‘स्वीडन' नेमके कुठे आहे हेही माहिती नसून, गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यासाठी एक रुपयाचाही विकासनिधी ते आणू शकलेले नाहीत, असा टोला त्यांनी खासदार निलेश लंके यांना लगावला.
पत्रकारांशी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी खासदारांच्या कार्यपध्दतीवर आणि राजकीय भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
डॉ. विखे पाटील म्हणाले, “खासदारांकडे काही ठरलेले जुजबी डायलॉग आहेत. आंतरराष्ट्रीय विषयांवर भाष्य करताना त्यांना ’स्वीडन' कुठे आहे हे तरी ठाऊक आहे का? ज्या विषयांची माहिती नाही त्यावर त्यांनी बोलू नये. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, मागील दोन वर्षांत जिल्ह्याच्या विकासासाठी यांना एक रुपयाचाही निधी आणता आलेला नाही. विकासाचे कोणतेही ठोस काम समोर दाखवता येत नसल्याने केवळ प्रसिध्दीसाठी अशा प्रकारची विधाने केली जात आहेत.”
राजकारणातील ढासळत्या पातळीवर चिंता व्यक्त करताना डॉ. विखे पाटील म्हणाले, “सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तीचे राजकीय आणि व्यक्तिगत आयुष्य पूर्णपणे वेगळे असते. राजकीय पटलावर पक्षीय भूमिका, तत्त्वे आणि आरोप-प्रत्यारोप चालत असतात; परंतु प्रत्येकाच्या व्यक्तिगत आयुष्याला आणि कौटुंबिक संवादाला एक मर्यादा असते. दुसऱ्यांच्या कौटुंबिक वादात नाक खुपसून त्याचे राजकारण करणे ही विकृती आहे.”
आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना डॉ. विखे पाटील म्हणाले, “गेल्या काही वर्षांत संबंधित खासदारांवर विविध गंभीर आरोप झाले, महिलांशी संबंधित प्रकरणे आणि ऑडिओ क्लिप्सही समोर आल्या. मात्र, मी कधीही त्या मुद्द्यांचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्यांच्या चारित्र्यावर, व्यक्तिगत आयुष्यावर भाष्य केले नाही. माझी अशी एकही बाईट किंवा विधान कोणी दाखवू शकत नाही. कोणाच्याही व्यक्तिगत आयुष्यात शिरून टीका न करणे, हा सुसंस्कृतपणा महाराष्ट्रातील सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांनी जपला आहे आणि मीदेखील तोच वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे.”
शेवटी बोलताना ते म्हणाले, “जिल्ह्यातील दुष्काळ, सिंचन, रोजगार आणि पायाभूत सुविधा यांसारख्या गंभीर प्रश्नांवर ज्यांच्याकडे कोणतेही व्हिजन किंवा ठोस मुद्दे नाहीत, तेच लोक कौटुंबिक बाबींचे भांडवल करत आहेत. अशा दिशाभूल करणाऱ्या राजकारणावर जिल्ह्यातील सुजाण जनतेने नक्कीच विचार केला पाहिजे.”