पावसाअभावी होरपळणाऱ्या जिल्ह्यातील सर्व १४ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर

संगमनेर Live
0
पावसाअभावी होरपळणाऱ्या जिल्ह्यातील सर्व १४ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर 

◻️ पालकमंत्री विखे पाटील यांची माहिती; पिण्याचे पाणी, चारा आणि रोहयो कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश

संगमनेर LIVE (लोणी) | जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाच्या मोठ्या तुटवड्यामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, दुष्काळ निवारणासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना व सवलती तातडीने लागू करण्यात आल्याची माहिती जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

​यावर्षी जिल्ह्यात सरासरीइतका पाऊस न झाल्याने खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. खरीप पिकांचे नुकसान आणि पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याची निर्माण झालेली टंचाई पाहता शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला होता व सर्व तालुक्यांना दुष्काळी सवलती लागू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने जाहीर केलेल्या राज्यातील २६५ तालुक्यांच्या दुष्काळी यादीत अहिल्यानगरच्या सर्व १४ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.

​चौदाही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाल्याने बळीराजाला मोठा दिलासा देणाऱ्या विविध सवलतींची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाणार असून, शेतीशी निगडित सर्व प्रकारच्या कर्ज वसुलीस तात्काळ स्थगिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांवरील आर्थिक भार हलका करण्यासाठी जमीन महसुलात पूर्ण सूट आणि कृषी पंपांच्या चालू वीज बिलात सवलत लागू करण्यात आली असून, टंचाईग्रस्त गावांमध्ये शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करण्याचे सक्त आदेश महावितरणला देण्यात आले आहेत. दुष्काळाचा फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसू नये यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. 

ग्रामीण भागात रोजगाराची समस्या उद्भवू नये म्हणून रोजगार हमी योजनेच्या (रोहयो) कामांच्या निकषांत शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे तात्काळ सुरू केली जात आहेत. याशिवाय, पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने टॅकर सुरू करणे, उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी व जनावरांसाठी राखून ठेवणे, जनावरांसाठी चारा छावण्या व डेपोचे नियोजन करणे, जलसंधारणाची कामे हाती घेणे आणि शेतकरी व शेतमजुरांना कोणत्याही परिस्थितीत अन्नधान्याची टंचाई भासणार नाही याची काटेकोर व्यवस्था उभारण्यात येत आहे.

​या निर्णयांची माहिती देताना पालकमंत्री ना. विखे पाटील म्हणाले, “राज्य सरकार अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा देण्यात आला होता, आताही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. शासनाने जाहीर केलेल्या सर्व सवलतींची व योजनांची अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने व गतिमान पध्दतीने करावी. या अंमलबजावणीचा आढावा मी स्वतः प्रत्येक तालुकानिहाय घेणार आहे.” असे देखील सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !