​आमदार खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुका ‘दुष्काळग्रस्त’ जाहीर

संगमनेर Live
0
​आमदार खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुका ‘दुष्काळग्रस्त’ जाहीर

◻️ कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिल व महसुलात सवलतींसह परीक्षा शुल्क होणार माफ

​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाई आणि खरीप पिकांच्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर, राज्य शासनाने संगमनेर तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश केला आहे. राज्यातील २६५ तालुक्यांसोबतच संगमनेर तालुक्यातही आता दुष्काळी सवलती लागू होणार असून, यामुळे संकटात सापडलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार अमोल खताळ यांनी शासनदरबारी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले आहे.

​शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार अमोल खताळ यांनी ही माहिती दिली. 

यावेळी परिस्थिती मांडताना ते म्हणाले की, “यंदा पावसाने मोठा खंड दिल्यामुळे तालुक्यातील खरीप पिके वाळून गेली असून खरीप हंगाम अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. या गंभीर संकटाची दखल घेत आपण स्वतः मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन संगमनेर तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली होती.” दोन दिवसांपूर्वीच राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथे प्रत्यक्ष बांधावर जाऊन सोयाबीनसह इतर नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली होती. शासनस्तरावरील पाहणी आणि लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा यानंतर शासनाने तालुक्याला दुष्काळाच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला.

​शासनाने तालुका दुष्काळग्रस्त घोषित केल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर शासकीय सवलतींचे संरक्षण मिळणार आहे. यानुसार शेती कर्जाच्या वसुलीला तात्काळ स्थगिती देऊन कर्जाचे पुनर्गठन करण्यात येईल. तसेच जमीन महसुलात पूर्ण सूट आणि शेतकरी पाल्यांच्या शालेय व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात सवलत लागू होणार आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा देताना साडेसात अश्‍वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांचे वीजबिल माफ करण्यात आले असून, दुष्काळ काळात शेतकऱ्यांचा वीजपुरवठा कोणत्याही कारणास्तव खंडित केला जाणार नाही. याव्यतिरिक्त मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामांना प्राधान्य दिले जाईल, तर पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टॅकरद्वारे पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पशुधनासाठी चारा उपलब्ध करण्याच्या उपाययोजना तातडीने राबविल्या जाणार आहेत.

​दरम्यान, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करताना कोणत्याही जाचक अटी-शर्ती न लावता ते सरसकट करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याचे आमदार खताळ यांनी स्पष्ट केले. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी वारंवार संकटात सापडत असला, तरी महायुतीचे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तसेच दुष्काळग्रस्त भागातील गरजू कुटुंबांतील मुलींच्या विवाहाचा प्रश्न उद्भवल्यास शिवसेना पुढाकार घेऊन अशा विवाहांची जबाबदारी घेईल, असा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

​“मागील वर्षी अतिवृष्टी आणि यंदा दुष्काळ अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. परंतु शासनाने संगमनेरचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक व प्रशासकीय बळ मिळेल. बळीराजाने खचून न जाता धीर धरावा, सरकार तुमच्या पाठीशी आहे.” अशी ग्वाही अमोल खताळ यांनी दिली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !