‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेमुळे शेतीला मिळाली नवी संजीवनी!

संगमनेर Live
0
‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेमुळे शेतीला मिळाली नवी संजीवनी! 

◻️ डॉ. सुजय विखे पाटलांकडून ​अस्तगाव शिवारात सौर कृषी पंपाची प्रत्यक्ष पाहणी


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | सक्षम आणि शेतकरीभिमुख नेतृत्वामुळे बळीराजाच्या जीवनात कसा आमूलाग्र बदल घडू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेतून पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना रात्रीच्या अंधारात शेतात न जाता दिवसा हक्काची, सुरक्षित आणि शाश्वत वीज मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही योजना शेतीसाठी मोठे वरदान ठरली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

​राहाता तालुक्यातील अस्तगाव शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतात नव्याने बसविण्यात आलेल्या ५ एचपी क्षमतेच्या सौर पंपाच्या सिंचनाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर डॉ. विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, ग्रामस्थ आणि स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​ग्रामीण भागात सध्या वीजपुरवठ्याच्या अनिश्चित वेळा आणि भारनियमनामुळे (लोडशेडिंग) पिकांना वेळेवर पाणी देणे शेतकऱ्यांना अत्यंत जिकिरीचे जात होते. रात्रीच्या वेळी वीज उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना अंधारात, वन्यजीव व सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका पत्करून शेतात जावे लागत असे. मात्र, ‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेमुळे शेतकरी आता दिवसा सौर ऊर्जेचा वापर करून आपल्या सोयीनुसार सिंचन करू शकत आहेत. लोडशेडिंग आणि रात्रीच्या वीजपुरवठ्याची वाट पाहण्याच्या त्रासातून शेतकऱ्यांची कायमस्वरूपी सुटका झाली असून, भविष्यातील ऊर्जेची गरज भागविण्यासाठी सौर पंप हा अतिशय प्रभावी पर्याय ठरत आहे.

​सौर पंपाबाबत ग्रामीण भागात पसरवल्या जाणाऱ्या गैरसमजांचा समाचार घेत डॉ. विखे पाटील म्हणाले की, सौर पंप केवळ कडक उन्हातच चालतो आणि ढगाळ हवामानात बंद पडतो, अशी खोटी चर्चा काही ठिकाणी केली जात आहे. मात्र, अस्तगाव येथे प्रत्यक्ष पाहणी केली असता पूर्णपणे ढगाळ वातावरण असतानाही ५ एचपीचा सौर पंप उत्तम दाबाने सुरू असल्याचे दिसून आले. तुषार सिंचनाच्या (स्प्रिंकलर) माध्यमातून तब्बल ५ ते १० एकर शेतीला या पाण्याने भिजवले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रत्यक्ष सौर पंपाचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधावा आणि योजनेचा लाभ घ्यावा.

​या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध करून दिले जात असल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण पूर्णपणे हलका झाला आहे. यामध्ये ३ एचपी क्षमतेच्या पंपासाठी शेतकऱ्याला केवळ १५ ते २० हजार रुपये, तर ५ एचपी पंपासाठी साधारण ३० ते ३५ हजार रुपये इतकाच नाममात्र खर्च स्वतः करावा लागतो. उर्वरित मोठा खर्च शासनाकडून अनुदानाच्या स्वरूपात थेट केला जात असल्याने सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही स्वतःच्या शेतात सौर संच उभारणे सहज शक्य झाले आहे.

​पूर्वी या परिसराला तीव्र दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत होता. मात्र, निळवंडे धरणाचे पाणी आणि सौर ऊर्जेच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आधुनिक सिंचन व्यवस्था यामुळे आज त्याच परिसरात शेती समृध्द होताना दिसत आहे. धरण क्षेत्रातील जलसाठा, निळवंडेचे पाणी, सौर पंप आणि महायुती सरकारच्या शेतकरीकेंद्रित धोरणांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली आहे.

दरम्यान, ​या योजनेची तत्परतेने अंमलबजावणी केल्याबद्दल डॉ. विखे पाटील यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेंतर्गत गावे आणि शेतकरी समृध्द करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने या सौर क्रांतीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !