गणेशोत्सवापूर्वी संगमनेर शहरातील खड्डे बुजवा!

संगमनेर Live
0
गणेशोत्सवापूर्वी संगमनेर शहरातील खड्डे बुजवा!

◻️ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना शिवसेना महायुतीचे निवेदन


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | शहरात भूमिगत गटार योजनेच्या संथ आणि नियोजनशून्य कामामुळे प्रमुख मार्गांसह अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. सध्या शहरात ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते’ अशी विदारक स्थिती निर्माण झाली असून, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर नगरपालिकेने शहरातील सर्व खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी शिवसेना महायुतीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

​संगमनेर शहरात भूमिगत गटारीच्या कामासाठी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची योग्य रीतीने डागडुजी न केल्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे दररोज लहान-मोठे अपघात घडत असून शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वार यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहनधारकांना मणक्याचे आजार आणि वाहनांचे मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या शांतता समितीच्या बैठकीत शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न गांभीर्याने उपस्थित करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही नगरपालिका प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. पालिकेने केवळ प्रसिध्दीचा देखावा न करता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून दर्जेदार दुरुस्ती करावी; तसेच गणेशोत्सवापूर्वी प्रमुख विसर्जन मार्ग व अंतर्गत रस्ते तातडीने पूर्ववत करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

दरम्यान, ​याप्रसंगी शिवसेना महायुतीचे राहुल भोईर, शशांक नामन, गुड्डू इंजिनिअर, बबलू काजी, जावेद शेख, सागर भोईर, पवन शिरतार, भगवान कुक्कर, महेश मांडेकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !